पुणे : ‘भारतीय भाषांमध्ये असलेल्या विवेक या शब्दाच्या इतिहासामुळे आपल्या डोळ्यांना विवेकाकडे बघताना काही मर्यादा येतात. बऱ्याचदा स्वतःला विवेकवादी म्हणवणाऱ्यांना अंधश्रद्धा म्हणजे नेमके काय, हेही नीट सांगता येत नाही,’ असे मत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांनी व्यक्त केले. ‘आपल्या शाळांच्या पाठ्यपुस्तकात रूसो, व्हॉल्टेअर, मॉन्टेस्क्यू यांची नावे म्हणजे उडद डाळ, तूर डाळ आणि मूग डाळीसारखी नावापुरती येतात,’ अशी मिश्किल टिपण्णीही डॉ. गणेश देवी यांनी केली.

राजहंस प्रकाशनाच्या वतीने आयोजित डॉ. अभिजित वैद्यलिखित ‘विवेकयात्री’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ. देवी बोलत होते. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, ‘राजहंस’चे संपादक डॉ. सदानंद बोरसे, डॉ. अभिजित वैद्य आदी या वेळी उपस्थित होते.

देवी म्हणाले, ‘आदी शंकराचार्यांनी विवेक-चुडामणी हा ग्रंथ लिहिला. त्यात ‘ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या’ म्हणजे जग खोटे आहे, असे मानून आत्म्याचा शोध घेतला, तरच ब्रह्माची प्राप्ती होते, अशी मांडणी केली. तर, मुकुंदराजांनी विवेकसिंधू हे मराठीतील पहिले पुस्तक लिहिले. त्यातही आपण जसे असतो, तसे नसतो. त्यापेक्षा काहीतरी वेगळेच असते, अशा प्रकारची मांडणी केली. वास्तवाच्या या व्याख्या अत्यंत वेगळ्या आहेत. या व्याख्यांचे ओझे घेतलेले मन विवेक या शब्दाकडे बघते, तेव्हा ‘सत्-असत् विवेक’ असा शब्द आपल्या डोक्यावर आदळत राहतो. याउलट विचारशक्ती ही नीतिमत्ता आणि शास्त्र दोन्ही वाढवेल, अशी असते. ज्या समाजात शास्त्र आणि नीतिमत्ता दोन्ही वाढते, असा समाज सुखी जीवन जगू शकतो. या समाजासाठीचा जो धर्म असेल, तोच विवेकाचा धर्म, अशी मांडणी प्रसिद्ध तत्ववेत्ता नित्शेने विवेकाबद्दल केली. आपल्याला माहिती असलेल्या विवेकाच्या अर्थापेक्षा नित्शेने केलेली मांडणी बरीच वेगळी आहे.’

‘विवेकवादाची शिळा शिखरावर नेल्यानंतर, ती घरंगळत खाली येते, तेव्हा पुन्हा नव्या उमेदीने आणि जोमाने शिखरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न विवेकाचे अनुयायी सातत्याने करतात. या सर्वांप्रती कृतज्ञ आणि कृतिशील राहून विवेकवादाची मशाल तेवत ठेवली पाहिजे,’ असेही देवी म्हणाले.

ममता क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.

प्राचीन भारतात विवेकाची गुढी रोवली गेली. आता मात्र विवेकवाद ढासळलेला दिसतो. सध्या जग, भारत आणि महाराष्ट्र अविवेकाने ग्रासलेला आहे. अशा काळात अविवेकाची काजळी नष्ट होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.- डॉ. राजा दीक्षित, माजी अध्यक्ष, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ