स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील यंदाचा गणेशोत्सव दारुमुक्त आणि प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी केला आहे. त्यासाठी ‘मोरया कार्यकर्ता मंच’ या नव्या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली असून या मंचाद्वारे कार्यकर्ते शहराच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विधायक सहयोग देतील. 

हेही वाचा – पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गर्दी ; मध्यभागात वाहतूक कोंडी

पुण्यनगरीचे ‘अष्टविनायक गणपती गणेशोत्सव २०२२’च्या वतीने शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, केसरीवाडा गणेशोत्सव, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट या मंडळांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. 

हेही वाचा – पुणे : शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विद्यापीठाकडून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम ; १ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

‘मोरया कार्यकर्ता मंच’च्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असला तरी गणेशभक्तांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष देत विधायक पद्धतीने सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील सर्व मंडळांनी या उपक्रमाचे अनुकरण करावे. मोरया कार्यकर्ता मंच वाहतूक कोंडी, नदी सुधारणा अशा शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करेल, असे शेटे यांनी सांगितले. 
पुढील वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी प्रत्येक गणेश मंडळांच्या मूर्तीची प्रतिकृती काश्मीरमध्ये पाठवण्यात येणार आहे. बारामुल्ला, अनंतनाग, कुपवाडा अशा महत्त्वाच्या ठिकाणी किमान दीड दिवसाचा गणेशोत्सव झाला पाहिजे यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.– पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट