कसबा पेठेतील हनुमान मंडळ प्रतिष्ठानतर्फे गणपतीच्या ‘पेन आर्ट’ (गिगलिंग) प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. अक्षय एकाडे या तरूण चित्रकाराने ही चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमधून नागरिकांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे.
अक्षय याने साध्या रंगीत बॉलपेनचा वापर करून ही चित्रे रेखाटली आहेत. झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, सायकल चालवा, कापडी-कागदी पिशव्या वापरा असा पर्यावरणविषयक संदेश देणारी, तसेच बाळकृष्ण, विठ्ठल, बासरी वादन करणारा अशा गणपतीच्या विविध भावमुद्रा दाखवणारी चित्रे प्रदर्शनात आहेत. तला चांगला प्रतिसाद मिळत असून, या कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. लोकांना गणेशाची विविध रूपे पाहायला मिळावी. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचावा या हेतूने ही चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत, असे मंडळाकडून सांगण्यात आले. या कलाकृती  कसबा पेठेतील माणिक चौक येथे सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत पुढील दोन दिवस हे प्रदर्शन पाहता येणार आहे.