पुणे : ‘गणेशखिंड रस्त्यावर अनेक महत्त्वाच्या आणि नामांकित संस्था आहेत. अतिमहत्त्वाच्या (व्हीव्हीआयपी) व्यक्तींसाठी हा रस्ता सतत वापरला जातो. मात्र आतापर्यंत या रस्त्याचा एकात्मिक नियोजन आराखडाच तयार केला नाही,’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आला. हा आराखडा तातडीने करण्यात यावा, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली जाणार आहे, असे माजी खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.
पक्षाच्या शहर कार्यालयात चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पक्षाचे महापालिकेतील गटनेते काका चव्हाण, मनाली भिलारे, माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णात घारे उपस्थित होते. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘गणेशखिंड रस्त्यावरील झाडांची माहिती घेत असताना महापालिकेने आत्तापर्यंत या रस्त्याचा सर्वसमावेशक एकात्मिक नियोजन आराखडाच तयार केला नसल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार गंभीर आहे. हा आराखडा तातडीने तयार करण्याची मागणी आम्ही महापालिका आयुक्तांकडे करणार आहोत. शहरातील विकास प्रकल्पावेळी होणाऱ्या वृक्षतोड प्रक्रियेमध्ये झाडांचे पुर्नरोपण, भरपाई वनीकरण यावर नियमानुसार भर देणे गरजेचे असते. प्रत्यक्षात महापालिकेकडून झाडांचे पुनर्ररोपण होत नाही. जुन्या झाडांच्या वयानुसार तितक्याच वयाचे वृक्ष लावले जात नाहीत.
झाडांसाठी जिओ टॅगिंग, जीआयएस मॅपिंग यांसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात नसल्याची माहिती पुढे आली आहे. या सर्व प्रकाराची माहिती महापालिका आयुक्तांना दिली जाणार आहे. त्यानंतर पुढील भूमिका घेतली जाईल.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशखिंड रस्ता हा शहरातील महत्त्वाचा रास्ता आहे. हा रस्ता रुंद करण्यासाठी तिथे वृक्षतोड केली जाणार आहे.
महापालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करताना कोणती झाडे तोडावी लागणार आहे. त्यांचे वयोमान किती आहे, ही झाडे तोडल्यानंतर त्याच्या बदल्यात अन्य कोणत्या ठिकाणी झाले लावली जाणार आहेत. याची माहिती असलेला आराखडा तयार करणे आवश्यक आहे. मात्र मामाने त्याने तो केला नसल्याचे समोर आले आहे.
नक्की काय आहे प्रकरण
गणेशखिंड रस्त्यावर सध्या मेट्रो प्रकल्प विकसीत होत आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी तसेच रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी या रस्त्यावरील सुमारे साडे पाचशेहून अधिक जुने वृक्ष तोडले जाणार आहेत. शहरातील अनेक सामाजिक, स्वयंसेवी व पर्यावरण प्रेमी संघटनांनी याला विरोध केला आहे. या संस्थांकडून १ मे रोजी गणेशखिंड रस्त्यावरील झाडांभोवती मानवी साखळी करून महापालिकेचा निषेध देखील नोंदविण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या, माजी खासदार वंदना चव्हाण यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी पत्रकार परिषद घेत हा प्रश्न मांडला होता. या वृक्षतोडीला होत असलेला विरोध पाहून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीसंदर्भात स्थगिती दिली आहे.
