चिकनच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ

पुणे :  श्रावण महिना, गणेशोत्सवामुळे गेले दीड महिने चिकन, मटण, मासळीला फारशी मागणी नव्हती. रविवारी गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर सामिष खवय्यांकडून चिकन, मटण, मासळीच्या मागणीत वाढ झाली असून आठवडय़ापूर्वी २०० रुपये किलो असलेल्या चिकनच्या दरात ४० रुपयांनी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होईपर्यंत पुढील पंधरा दिवस चिकन, मटण, मासळीला खवय्यांकडून मागणी राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आठवडय़ातून किमान दोनदा सामिष पदार्थाचा आस्वाद घेणारे सामिष खवय्ये श्रावण महिना आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या गणेशोत्सवात सामिष पदार्थ वज्र्य करतात. गेले दीड महिने सामिष खवय्यांनी कटाक्षाने निरामिष पदार्थाचे सेवन केले. रविवारी (१९ सप्टेंबर) गणेशोत्सवाची सांगता झाली. सोमवारी अनेक जण सामिष पदार्थाचे सेवन करत नाहीत. गणेशोत्सव संपल्यानंतर मटण, मासळी, चिकनच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी म्हणाले, ‘गणेशोत्सवानंतर मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. खवय्यांची पसंती सुरमई, रावस, पापलेट, हलवा या मासळीला आहे. खोल समुद्रातील मासळीच्या मागणीत वाढ झाली आहे. लहान आकाराच्या सुरमईच्या दरात घट झाली आहे. खोल समुद्र, नदी तसेच खाडीतील मासळीची आवक चांगली होत आहे.’ मटणाच्या मागणीत वाढ झाली असून उपाहारगृह तसेच किरकोळ ग्राहकांकडून मटणाला मागणी चांगली असल्याचे पुणे शहर मटण विक्रेता दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

मटण, मासळी,

चिकनचे दर

मटण- ६६० रुपये किलो

चिकन- २३० ते २४० रुपये किलो

इंग्लिश अंडी- ६० रुपये डझन (पाच रुपये नग)

गावरान अंडी- १२० रुपये डझन (दहा रुपये नग)

सुरमई-२४० ते ६०० रुपये

पापलेट- ४८० ते १३०० रुपये

हलवा- ४४० ते ५५० रुपये

रावस- ६०० ते ८०० रुपये

गेल्या आठवडय़ात चिकनचे दर २०० रुपये किलो होते. गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर खवय्यांकडून चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. चिकनच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. इंग्लिश अंडय़ांचे दर स्थिर आहेत. वातावरणात गारवा वाढल्याने गावरान अंडय़ांच्या दरात वाढ झाली आहे.

– रुपेश परदेशी, संचालक, पुणे जिल्हा बॉयलर ट्रेडर्स असोसिएशन