पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांची मागणी वाढली असून, व्यावसायिक आणि घरगुती व्यावसायिकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र, साखर, गूळ, तांदूळ, दुग्धजन्य पदार्थ, सुका मेवा, गॅस यासह कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे यंदा उकडीच्या मोदकांना महागाईची झळ बसणार आहे. कच्च्या मालाचा वाढता खर्च भागवण्यासाठी यंदा मोदकांच्या किमतीत प्रतिनग पाच ते सात रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती मोदक व्यावसायिकांनी दिली.
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत शहरात उकडीच्या मोदकांना चांगली मागणी असते. यामुळे मोठ्या व्यावसायिकांसह महिला बचत गट आणि घरगुती विक्रेत्यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपासून ते अगदी घरोघरी प्रसादासाठी मोदकांची खरेदी केली जाते. मात्र, यंदा गूळ आणि तांदूळ यांसारख्या आवश्यक कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी साखरेच्या दराने उच्चांक गाठला होता. आता दर स्थिर झाले असले तरी, गुळाचे भाव प्रति किलो ६५ रुपयांवर पोहोचले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यातच एलपीजी गॅसच्या दरवाढीची भर पडल्याने यंदा उकडीचे मोदक तयार करण्याचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे.
व्यावसायिकांचे म्हणणे काय ?
स्वामीराज फूड सेंटरचे संदीप शिंदे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, या व्यवसायामध्ये २००५ सालापासून असून, गेल्या काही वर्षांत महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साखर, गूळ तांदूळ गॅस, कामगारांची मजुरी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने २००५ मध्ये मोदक प्रतिनग दहा रुपयांना होता. तो आता ४५ रुपयांपर्यंत गेला आहे. गेल्या वर्षी याच मोदकाची किंमत सुमारे ३० ते ३५ रुपये होती. मागणीत घट झालेली नाही.
नोकरदार महिलावर्ग वाढल्याने दरवर्षीच मोदकांना मागणी वाढत आहे. असे सांगत श्री मोदकचे हर्ष माने म्हणाले की, आम्ही दररोज दहा ते बारा हजार मोदक बनवतो. गणेशोत्सवाच्या काळात तब्बल दोन ते सव्वादोन लाख मोदक बनवले जातात. पुण्याबरोबरच मुंबई, धुळे, अहमदाबाद आदी ठिकाणी मोदकांना मागणी आहे. पूर्वी गणेशोत्सवाच्या काळातच मोदकांसाठी मागणी असायची. मात्र, आता बाराही महिने मोदकांना चांगली मागणी असते.
गौरव स्नॅक्स च्या स्वाती व्यवहारे म्हणाल्या की, यंदा भेसळ विरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम उघडली असून, त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे. गूळ, साखर, तांदूळ हा कच्चा माल भेसळविरहीत आहे, याची आता हमी ग्राहकांना यंदा मिळणार आहे. चांगल्या प्रतीचा माल असल्याने किमतीतही थोडीफार वाढ झाली आहे.
