पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात डीजेसह ढोल- ताशामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला होता. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी या विरोधात आवाज उठवला होता. त्यांच्या या मागणीला जाहीर पाठिंबा देत पुणेकरांनी रस्त्यावर उतरून मोर्चाही काढला होता. याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या गणेशोत्सव झाल्याचे दिसून आले आहे. उत्सवाच्या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुमारे २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी केलेल्या तपासणीत आवाजाची सरासरी पातळी गेल्या वर्षीपेक्षा कमी नोंदवण्यात आली. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाजाची सर्वोच्च पातळी गणेश आगमन आणि विसर्जनादिवशीही कमी झाल्याचे आढळून आले.
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाची तपासणी करण्याची निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पोलिसांना गेल्या वर्षी दिले होते. त्यानुसार गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुणे परिसरातील २०० गणेश मंडळांच्या ठिकाणी उत्सव काळात सायंकाळी सहा ते रात्री बारा या वेळेत आवाजाची पातळी नोंदवण्यात आली. याचबरोबर पुणे परिसरातील महत्त्वाच्या १५ चौकांमध्ये ध्वनिप्रदूषणाची तपासणी करण्यात आली. यंदा सर्वच गणेश मंडळांच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे मंडळाच्या तपासणीतून समोर आले आहे. असे असले तरी उत्सव काळातील दिवसांमध्ये अनेक मंडळाच्या परिसरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीपेक्षा २.५ ते १०.५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे आढळून आले.
आगमन, विसर्जनाला सर्वोच्च पातळी
यंदा गणेश आगमनाच्या दिवशी आवाजाची सर्वोच्च पातळी ९९.४ डेसिबल नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी ही पातळी १०९ डेसिबलपर्यंत नोंदविण्यात आली होती. पुणे परिसरातील महत्वाच्या ठिकाणी आवाजाच्या पातळीत ३.६ टक्के घट तर काही ठिकाणी ५.६ टके वाढ झालेली दिसून आली. विसर्जनादिवशी पुणे परिसरात सगळीकडे आवाजाच्या पातळीत मोठी वाढ नोंदविण्यात आली. तरी गेल्या वर्षी पेक्षा ही पातळी कमी असल्याचे समोर आले आहे.
उत्सव काळातील ‘हॉटस्पॉट’
यंदा संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात बंडगार्डन, बिबवेवाडी, सदाशिव पेठ, नारायण पेठ, वारजे, जंगली महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता हे ध्वनी प्रदूषणाचे हॉटस्पॉट असल्याचे समोर आले. गेल्या वर्षीही याच भागात ध्वनिप्रदूषण सर्वाधिक असल्याची परिस्थिती होती.
नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार यंदा गणेशोत्सव काळातील ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेण्यात आल्या. यानुसार उत्सवात सगळीकडेच ध्वनिप्रदूषण मर्यादेचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच तयार केला जाणार असून तो संबंधित यंत्रणांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला जाणार आहे. या यंत्रणांकडून अहवालाच्या आधारे दोषी आढळणाऱ्यांवर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्तिकेय लंगोटे यांनी दिली.
