चित्रफितीतून माहिती घेऊन एटीएम फोडले ; यवत, कुरकुंभ येथील प्रकरणांची उकल; टोळी जेरबंद

कुरकुंभ आणि यवत येथे १६ आणि १७ जानेवारीला एटीएम यंत्र फोडून २३ लाख ८० हजार ७०० रुपयांची रक्कम चोरटय़ांनी चोरून नेली होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

पुणे : यवत आणि कुरकुंभ येथील बँकेचे एटीएम यंत्र गॅस कटरच्या साहाय्याने फोडून रोकड चोरून नेणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दहा लाखांची रोख रक्कम आणि यंत्र फोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.  चोरटय़ांनी समाजमाध्यमातील चित्रफितीतून माहिती घेऊन आणि त्यानुसार ऑनलाइन साहित्य मागवून एटीएम यंत्रं फोडली असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

अजय रमेशराव शेंडे (वय ३२, रा. सहजपूर, ता. दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय २५, रा. करंजी, ता. रिसोड, जि. वाशिम) आणि हृषीकेश काकासाहेब किरतिके (वय २२, रा. देवधानुरा, ता. कळंब, जि उस्मानाबाद) अशी अटक

केलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्यासह इतर दोघांनी मिळून हा गुन्हा केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते.

कुरकुंभ आणि यवत येथे १६ आणि १७ जानेवारीला एटीएम यंत्र फोडून २३ लाख ८० हजार ७०० रुपयांची रक्कम चोरटय़ांनी चोरून नेली होती. त्यामुळे ग्रामीण भागात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि यवत पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चार पथके स्थापन करण्यात आली होती. पथकाने सीसीटीव्ही चित्रफितीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आरोपी अजय शेंडे याला सहजपूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर इतर आरोपी हाती लागले. आरोपींनी केलेले इतर दोन गुन्हेही उघडकीस आले आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संदीप येळे, उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, कर्मचारी  तुषार पंदारे, राजू भोमीन, अजित भुजबळ, आसिफ शेख, अजय घुले, प्रमाद नवले यासह यवत पोलीस ठाण्याचे संजय नागरगोजे, गुरू गायकवाड, नीलेश कदम, मारूती बाराथे, रामदास जगताप, महेंद्र चांदणे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

जिल्ह्यात १० टक्केच एटीएममध्ये सुरक्षारक्षक

पुणे ग्रामीण भागात आठशेपेक्षा जास्त एटीएम यंत्र आहेत. त्यामध्ये केवळ १० टक्के एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. बँकांमध्ये तसेच एटीएम केंद्रांमध्ये सुरक्षारक्षक नेमण्याचे प्रमाण कमी केले आहे. बँकांनी एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक ठेवावेत, यासाठी जिल्ह्यांतील बँक अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gang arrested by pune rural police for breaking atm with gas cutter zws

Next Story
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कलादालने बंद
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी