पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास १५ टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अभियंत्याची एक कोटी ११ लाखांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सायबर सेलच्या पथकाने २४ तासांत अटक केली.
शरद दिलीप सराफ (वय ४८), सूरज तात्याराम सायकर (वय २८), संकेत संदीप न्हावले (वय २४), नागेश नरसिंगराव गंगे (वय २८, चौघे रा. हडपसर) आणि योगिराज किसन जाधव (वय २९, रा. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अभियंत्याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्याशी संपर्क करून ट्रेडिंग ॲपवर गुंतवणूक केल्यास १५ टक्के नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला नफा दाखवून विविध बँक खात्यांमध्ये एक कोटी ११ लाख १५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फिर्यादीला त्यावर चांगला नफा दिसत होता. हा नफा काढण्याचा प्रयत्न फिर्यादीने केला असता, त्यांच्या खात्यावर रक्कम येत नव्हती. रक्कम काढण्यासाठी शासकीय कर भरावे लागतील, असे सांगून पैसे अडविण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दिल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, फौजदार सागर पोमण, प्रकाश कातकाडे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणावरून नागपूर येथून सराफ याला ताब्यात घेतले. त्यानंतर सायकर आणि न्हावले यांना अटक करण्यात आली. गंगे आणि जाधव यांनीही बँक खात्यांद्वारे फसवणुकीचे पैसे रोख स्वरूपात काढून ‘यूएसडीटी क्रिप्टो करन्सी’मध्ये रूपांतरित केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर क्रिप्टो रक्कम विविध प्लॅटफॉर्मवर विकून भारतीय चलनात परिवर्तित केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी स्पष्ट केले.