चोरटय़ाने केली होती मराठी चित्रपटात भूमिका
एका गाजलेल्या मराठी चित्रपटात अत्यल्प काळासाठी भूमिका करणाऱ्या पुण्यातील कासेवाडी भागात राहणाऱ्या एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने पर्वती गावातील बंगल्यात घरफोडी करून एक किलो सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चोरटय़ांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्याकडून चोरलेल्या दागिन्यांसह कॅमेरा, घडय़ाळे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अमोल किसन अवचरे (वय १९), योगेश बाबा चौधरी (वय १९, दोघे रा. कासेवाडी, भवानी पेठ), प्रतीक संजय वाघमारे (वय २०, रा.शेवाळवाडी, हडपर) व बिपीन बाळकृष्ण कुलकर्णी (वय ३९, रा. अमृतेश्वर कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे दागिने विकत घेणारा सराफ सागर अशोक शहाणे (वय २६, रा. तुपे वस्ती, उरळी कांचन) यालादेखील अटक करण्यात आली आहे. पर्वती गावात चंदन नावाच्या बंगल्यात खिडकीचे गज तोडून चोरटय़ांनी मे महिन्यात एक किलो सोन्याचे दागिने आणि अर्धा किलो चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारने या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना घरफोडी करून पसार झालेले चोरटे कासेवाडी भागातील असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी तपास करून अमोल अवचरे आणि योगेश चौधरी यांना पकडले. चोरलेले दागिने सराफाला विकण्यासाठी आरोपींचे साथीदार वाघमारे आणि कुलकर्णी यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. आरोपी चौधरी याने एका गाजलेल्या मराठी चित्रपटात भूमिका केली होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. चौधरी याच्या घरात दागिने सापडले आहेत. चौधरी याने गाजलेल्या मराठी चित्रपटात तसेच पाच लघुपटात छोटी भूमिका केली होती. पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील, सहाय्यक आयुक्त अरूण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे, सहाय्यक निरीक्षक अन्सार शेख, गणेश पाटील, उपनिरीक्षक विलास पालांडे, संजय गवारे, अमित गायकवाड, प्रमोद वेताळ, संतोष बर्गे, गणेश काळे, राजू मचे, दिलीप लोखंडे, धर्मराज आवटे, प्रवीण दळे, राजाराम काकडे, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, स्वप्नील शिंदे, प्रमोद हिरळकर, मोहनदास पाटील यांनी ही कारवाई केली. आरोपी अवचरे आणि चौधरी यांनी जवळपास शंभर तोळे दागिने चोरले होते. त्यापैकी ६२ तोळे दागिने पोलिसांनी जप्त केले . मौजमजा करण्यासाठी त्यांनी दहा दिवसांत ३८ तोळे दागिने उरळी कांचन येथील सराफाला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.