पिंपरी : सायबर फसवणुकीसाठी बँक खाते पुरविणार्‍या झारखंड, गुजरात, ओडिशा येथील सहा जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी कंबोडियातील एकाला हजारो बँक खाती दिल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शुभम मोहन लोंढे ( वय २४, रा. चिखली), सॅम ऊर्फ डेविड ऊर्फ संबीधकुमार श्रीपती नायक ( वय २२, रा. ओडिशा), प्रोफेसर उर्फ हिमांशुकुमार गणेश ठाकुर ( वय २४, रा. झारखंड), राजअंश संतोष सिंग ( वय २१, भुगाव. मूळ रा. झारखंड), गौरव अनिलकुमार शर्मा ( वय ४०, रा. गुजरात) आणि अंकुश रामराव मोरे ( वय ३१, रा. नाशिक) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्‍त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सायबर पोलीस ठाण्‍यात दाखल असलेल्‍या एका गुन्‍ह्याचा तपास करीत असताना शुभम हा सायबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे बँक खाते पुरविण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. त्‍यानुसार त्‍याला ताब्‍यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने हे खाते सॅम याला दिल्याचे सांगितले. सॅम हा दोन वर्षांपासून देशातील बँक खातेधारकाशी टेलीग्रामद्वारे संपर्क साधत होता. त्‍यांचे खाते कंबोडियातील आरोपीस देत होता. तो २० पेक्षा जास्त मोबाइल नंबर वापरत असल्याचे समोर आले. त्‍याला २३ जानेवारी रोजी हिंजवडीतून अटक केली.

सॅमकडून मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे भुगाव, घोटावडे, भुकुम, बावधन, हिंजवडीमधील हॉटेलवर जाऊन पोलिसांनी पाच खातेदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत लक्ष ठेवणारे ‘गेट किपर’ही होते. खातेदारकांनी सापळा रचू नये, आरोपी पकडले जाऊ नयेत यासाठी ते ‘वॉचर’मार्फत बँक किट ताब्यात घेऊन कुरिअरद्वारे आरोपी रहात असलेल्या बावधन येथील सदनिकेवर पाठवत होते. पोलिसांनी बावधन येथील सदनिकेवरुन राजअंश याला ताब्‍यात घेतले. तो बँक किट जमा करुन कंबोडिया येथील मुख्‍य आरोपीला पाठवत होता. सॅम हा दोन वर्षांपासून कंबोडिया देशातील आरोपीसोबत हे काम करत असल्‍याचे दिसून आले. बलसाड गुजरात येथून खाते पुरविणारा गौरव आणि अंकुश याच्‍यासह सहा आरोपींकडून नऊ मोबाइल, एक टॅब, दहा धनादेश बुक हस्‍तगत केले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang of six arrested for providing bank accounts for cyber fraud arrested by pimpri chinchwad cyber police pune print news ggy 03 ssb