पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी प्रामुख्याने लक्ष्य केले असून, गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये शिरून चोरटे महिलांच्या हातातील बांगड्या कटरचा वापर करून तोडून नेत असल्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत बस प्रवासी महिलांचे दागिने चोरल्याच्या ४० हून अधिक घटना घडल्या आहेत.

शहरातील स्वारगेट, हडपसर, महापालिका भवन, पूलगेट, कात्रज परिसरातील पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गर्दीच्या मार्गावरील बसमध्ये प्रवेश करून चोरटे महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड, मोबाइल संच लांबवून पसार होतात. पीएमपी बसमध्ये प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत होत आहे.

दरम्यान, पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेकडील पावणेदोन लाखांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी (१ जून) सायंकाळी शंकरशेठ रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६५ वर्षीय महिला कोथरूड भागात राहायला आहेत. त्या पीएमपी बसने मंगळवारी (१ जुलै) प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीत कटरचा वापर करून त्यांच्या हातातील पावणेदोन लाख रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली.

चोरीची पद्धत काय?

‘बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांवर चोरटे लक्ष ठेवतात. त्यांच्याजवळ घोळका करून थांबतात. गर्दीत अलगदपणे त्यांच्या पिशवीतून ऐवज, तसेच हातातील बांगडी कापून नेतात. यात महिलांचा समावेश असण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपी स्थानक परिसरात गुन्हे शाखेच्या पथकांकडून गस्त घालण्यात येत आहे, तसेच अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या सराइतांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. सराइतांची चाैकशी सुरू करण्यात आली आहे.- पंकज देशमुख, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा