पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये नेपाळमधील दोन तरुणांचा समावेश आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील रोकड वळविण्यात आल्यानंतर ती आरोपीच्या खात्यात जमा व्हायची. आरोपींकडून १० मोबाइल संच, पेन ड्राइव्ह, चार लॅपटाॅप, ५३ बँकांचे डेबिट कार्ड, १७४ सिमकार्ड, २७ क्यूआर कोड, विविध कंपन्यांचे शिक्के, धनादेश पुस्तिका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अनिकेत प्रशांत भाडळे (वय २७, रा. शिवाजीनगर गावठाण), नोरबू शेर्पा (वय २८), अंग नुरी शेर्पा (वय २१, दाेघे रा. नेपाळ), सागर मच्छिंद्र गायकवाड (वय २६, रा. गणेशमळा, सिंहगड रस्ता), शिवतेज अशोकराव गुंजकर (वय ३३, रा. जांभूळवाडी, आंबेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. फसवणुकीतील १४ लाख ३० हजारांची रकम आदियोग स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी या खात्यात वळविण्यात आली होती. हे खाते भाडळे याचे असल्याची माहिती तपासात मिळाली. पोलिसांनी भाडळेला ताब्यात घेतल्यानंतर तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शेर्पा, गायकवाड, गुंजकर यांची नावे निष्पन्न झाली. पाेलिसांच्या पथकाने नऱ्हे भागातील एका हाॅटेलमधून शेर्पा यांना अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी भाडळेने बनावट कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या नावे एका बँकेत खाते उघडले होते. या खात्याचा वापर सायबर चोरट्यांना करण्यास दिला होता. फसवणूकप्रकरणाची व्याप्ती मोठी असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, सहायक फौजदार संदेश कर्णे, पोलीस कर्मचारी प्रवीणसिंह रजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बोऱ्हाडे, बाळासाहेब चव्हाण यांनी ही कामगिरी केली.