दापोडीत घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो हॉटेल ला विकणाऱ्या टोळीचा सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे गॅस रिफलिंग करताना आरोपींना पकडण्यात आल आहे. एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करत ६ लाख ९७ लाखांचा मुद्देमाल सामाजिक सुरक्षा पथकाने जप्त केला आहे. नागेंद्रपाल योगेंद्रपाल सिंह, छोटू श्रीभगवान बघेल अशी गॅस रिफलिंग करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

या कारवाईमध्ये देगलूरकर गॅस एजेंसी, वंदना गॅस एजन्सी, कांकरिया गॅस एजन्सी येथील घरगुती गॅस सिलेंडरमधून २ किलो गॅस काढून घेतला जात होता. परंतु, याची भणक संबंधित गॅस चालक मालकांना आरोपीनी होऊ दिली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथील वसंत काटे यांच्या मोकळ्या जागेत बन्टुसिंह हा देगलूरकर गॅस एजन्सी, वंदना गॅस एजन्सी, कांकरिया गॅस एजन्सीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर प्राप्त करून देत होता. तर, देविदास बिरादार हा विविध हॉटेलला गॅस विक्री करत होता. अशा प्रकारे दोघांची अवैध गॅस विक्री जोरात सुरू होती. या प्रकरणाची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांना माहिती मिळाली.

त्यानुसार, दापोडी येथील वसंत काटे यांच्या मोकळ्या जागेत जाऊन तिथे छापा टाकला असता गॅस रिफलिंग केली जात असल्याच उजेडात आलं. या प्रकरणी चालक आणि मालक अशा एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ लाख ९७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घरी गॅस एजन्सीकडून गॅस वितरित होताना त्याचे वजन करून घ्यावे, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. टाळाटाळ केल्यास संबंधित एजन्सीला त्यांची तक्रार करा, असे आवाहन  सामाजिक सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांनी केले आहे.