पुणे : शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेतील (ट्रॅफिक कंट्रोल बॉक्स) बॅटरी चोरणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी गजाआड केली. चोरट्यांनी ३४ बॅटरी चोरल्या असून, आतापर्यंत केलेल्या तपासात त्यांच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सिग्नल यंत्रणा अद्ययावत केली असून, वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर बॅटरीवर सिग्नल यंत्रणा सुरू राहते. या बॅटरीला सेन्सर बसविण्यात आल्याने बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून एका रिक्षाचालकासह साथीदारांना पकडले.

या प्रकरणी रिक्षाचालक दीपक अमोल कांबळे (वय ३२, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), चाँद उस्मान शेख (वय २८, रा. रामनगर, रामटेकडी, हडपसर), विकास ऊर्फ टकल्या विजय माने (वय ३६, रा. अरोरा टॉवर्सजवळील पदपथ, लष्कर), अली मुल्ला शेख (वय २७, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. पुणे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सिग्नल यंत्रणेतील बॅटरी बसविणे, तसेच अन्य तांत्रिक बाबींची जबाबदारी एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.

पुणे-सोलापूर रस्त्यावरील एएफएमसी चौक, रेसकोर्स, काळूबाई मंदिर चौकातील सिग्नल यंत्रणेतील सहा बॅटरी चोरीला गेल्याची तक्रार संबंधित खासगी कंपनीकडून वानवडी पोलिसांकडे २७ जानेवारी रोजी देण्यात आली होती. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. बॅटरी चोरून पसार झालेल्या चोरट्यांची माहिती पोलीस कर्मचारी आशिष कांंबळे आणि बालाजी वाघमारे यांना मिळाली. रिक्षाचालक दीपक कांबळे हा साथीदारांसोबत रिक्षातून निघाला असून, तो बॅटरी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चौघांना पकडले.

चोरट्यांकडून कटावणी, ६८ हजार रुपयांच्या ३४ बॅटरी, तसेच रिक्षा जप्त करण्यात आली. चोरट्यांनी काळूबाई मंदिर चौक, एएफएमसी चौक, रेसकोर्स चौक, बी. टी. कवडे रस्ता, येरवड्यातील सादलबाबा चौक, लष्कर भागातील धोबी घाट, सातारा रस्त्यावरील पुष्पमंगल चौकात असलेल्या सिग्नल यंत्रणेतील बॅटरी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींनी वानवडी, लष्कर, लक्ष्मीनगर, मार्केट यार्ड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बॅटरी चोरीचे गुन्हे केले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब जाधव, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस कर्मचारी महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद यांनी ही कामगिरी केली.