पुणे : ‘गंगोत्री होम्स’च्या रौप्यमहोत्सवानिमित्त ‘रूद्र’ संस्थेच्या मेधा ताडपत्रीकर आणि अंबाजोगाई येथील ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया यांना पर्यावरण संवर्धनातील योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रविवारी (१५ जून) मयूर काॅलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ताडपत्रीकर यांना गंगोत्री होम्स पृथ्वी पुरस्काराने तर, लोहिया यांना गंगोत्री जल पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यानिमित्ताने ‘पर्यावरण व विकास यांचा समतोल’ या विषयावर जावडेकर यांचे बीजभाषण होणार आहे, अशी माहिती ‘गंगोत्री होम्स’चे संचालक मकरंद केळकर, राजेंद्र आवटे आणि गणेश जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.