लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : …आकर्षक विद्युत रोषणाई… फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल…ढोल ताशांच्या दणदणाट… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात फुलांची मनसोक्त उधळण करत उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात गणरायाला चिंचवडकरांनी निरोप दिला. रात्री बारा वाजेपर्यंत ३६ गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. साडे सात तास विसर्जन मिरवणूक चालली.

चिंचवड, चापेकर चौकात महापालिकेच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजय खोराटे, उल्हास जगताप, उपायुक्त रविकिरण घोडके यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शिवतेज मित्र मंडळाची मिरवणूक साडेचार वाजता विसर्जन घाटाकडे रवाना झाली. त्यानंतर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास ढोल ताशांच्या गजरात चिंचवड स्टेशन येथील श्री ओंकार तरुण मंडळाची मिरवणूक आली. सद्गुरू गणेश मंडळाने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

आणखई वाचा-पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात विसर्जन

मंगलमूर्ती मित्र मंडळाचे गणराय पालखीत विराजमान झाले होते. हरिनामाच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली. भोई आळीतील उत्कृष्ट तरुण मंडळाने ‘स्वराज्यभिषेकाचा’ देखावा सादर केला होता. फुलांची मनसोक्त उधळण केली. गांधीपेठ तालीम मंडळाने ‘अश्व मल्हार’चा देखावा सादर केला होता. भंडा-याची मनसोक्त उधळण केली. भगव्या टोप्या परिधान करत आणि फुगडी खेळत महिला सहभागी झाल्या होत्या.

चिंचवडचा राजा संत श्री ज्ञानेश्वर मित्र मंडळाने शिवाची मूर्ती असलेल्या रथातून गणरायाची मिरवणूक काढली. उज्जैन येथील ओम प्रतिष्ठानचे डमरू पथक सहभागी झाले होते. जय गुरुदत्त मित्र मंडळाने फुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढली. मुंजोबा मित्र मंडळाने आकर्षक फुलांची सजावट केली होती. क्रांतीविर भगतसिंह मित्र मंडळाचे गणराय फुलांनी सजवलेल्या पालखीतुन दाखल झाले. महिलांनी पालखी खांद्यावर घेतली होती. माळी आळीतील ज्ञानदीप मित्र मंडळाने ‘श्री कृष्ण’ रथ साकारला होता. बैलगाडा शर्यतीचा देखावा सादर केला.

आणखी वाचा-कोयता गँगचा बिमोड…गणेश विसर्जन मिरवणुकीत थेट देखावाच साकारला!

नवतरुण मित्र मंडळाचे गणराय विद्युत रोषणाई केलेल्या रथात विराजमान झाले होते. गावडे कॉलनी सांस्कृतिक मित्र मंडळाने आकर्षक अशी फुलांची सजावट केली होती. भोई आळीतील उत्कृष्ट तरुण मित्र मंडळाने ‘विठ्ठलरथ’ साकारला होता. भोईर आळीतील मोरया मित्र मंडळाची श्रीरामाची मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. समर्थ कॉलनी मित्र मंडळाने ‘वज्ररथ’ साकारला होता.

समर्थ मित्र मंडळाने ‘पावनखिंड’ देखावा सादर केला. समता तरुण मित्र मंडळाने ‘शिवरथ’ साकारला होता. नवभारत तरुण मंडळाने फुलांच्या सजावटीमध्ये ‘मयूररथ’ सादर केला होता. श्रीमान महासाधू मोरया गोसावी मित्र मंडळाने श्रीरामाची मूर्ती साकारली होती. छत्रपती शाहू तरुण मंडळाने ‘राधाकृष्ण’ रथ साकारला होता. श्री छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाने ‘श्री दत्त सांप्रदाय रथ’ साकारला, श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने ‘हिंदवी स्वराज्य रथ’, गावडे पार्क मित्र मंडळाने ‘परीरथ’, सुदर्शन मित्र मंडळाने ‘बालाजी रथ’, श्री मयुरेश्वर मित्र मंडळाने ‘बालाजीरथ’ साकारला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati visarajan in pimpri chinchwad in devotional atmosphere pune print news ggy 03 mrj
First published on: 29-09-2023 at 09:17 IST