scorecardresearch

Premium

५५ शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे एकच संमेलन

‘जाणता राजा’मध्ये काम करणे, फेटे बांधणे आणि तबलावादन असे गुण जोपासणाऱ्या धनराज काळे याचा सत्कार करण्यात आला.

थंडीच्या दिवसांमध्ये शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची गडबड आणि धांदल सुरू असते ती स्नेहसंमेलनाच्या तयारीची. एका शाळेचे किंवा महाविद्यालयाचे एकच संमेलन होते. त्यातही एकेका वर्गाचे किंवा इयत्तांचे विद्यार्थी कलाविष्कार सादर करतात. असेच एक स्नेहसंमेलन झाले ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या ज्ञानवर्धन अभियानामध्ये सहभाग घेतलेल्या ५५ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे.
या स्नेहसंमेलनात गाणी होती. नृत्याचा जल्लोष होता. आरोग्याचे महत्त्व पटवून देणाऱ्या शारीरिक कसरती होत्या. इतिहास घडविणारे क्रांतिकारक आणि आईची महती सांगणाऱ्या नाटय़छटादेखील होत्या. इयत्ता पाचवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ते एकत्रितपणे सादर केले. २७५ विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या संमेलनाचे जैफ शेख, कृपा पायगुडे, अनुजा चव्हाण, अश्विनी पडवळ, ऋत्विक सरोदे या विद्यार्थ्यांंच्याच हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ या वेळी प्रमुख पाहुणे होते.
गणेश वंदनाने प्रारंभ झालेल्या कार्यक्रमामध्ये लहान-मोठय़ा २० विद्यार्थिनींनी ‘उदे ग अंबे उदे’ या गोंधळातून देवीची आराधना केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीवरच रचलेल्या ‘कृपा असू दे आम्हावरी’ या गाण्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केला. ट्रस्टच्या कोंढवा येथील बालसंगोपन केंद्रातील विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे सहजतेने उभारत उत्तम आरोग्य कसे राखावे याचा कानमंत्रच दिला. पाच गीतांतून श्रीकृष्णाचे जीवनदर्शन सादर झाले. त्यामध्ये ११० विद्यार्थी सहभागी झाले होते.
कथाकथन, गीतापठण स्पर्धेत यश मिळविलेल्या श्रीपाद एडके, रत्नाकर कोल्हटकर, मुष्टियुद्ध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर पदके मिळविलेला अनिकेत कांबळे यांच्यासह स. प. महाविद्यालयातील नंदिनी आदवडे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील सुकन्या साळुंके या दोघी नृत्याची आवड पूर्ण करण्यासाठी पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस घेतात या साऱ्या गुणवंतांची शेठ यांना ओळख झाली. ‘जाणता राजा’मध्ये काम करणे, फेटे बांधणे आणि तबलावादन असे गुण जोपासणाऱ्या धनराज काळे याचा सत्कार करण्यात आला. समाधान कांबळे आणि तेजश्री बोडके या विद्यार्थ्यांनीच स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त शंकरराव सूर्यवंशी, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख, डॉ. भरत देसाई, अरुण भालेराव आणि अर्चिता मडके या वेळी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gathering of 55 school and colleges

First published on: 02-01-2016 at 03:19 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×