भारतातील युवक उद्योग आणि पैसा खेचून आणतील – नरेंद्र मोदी

‘देशाचे डरडोई उत्पन्न हे ७.४ टक्क्य़ांपर्यंत पोहोचले असून जगाचे लक्ष भारताच्या प्रगतीकडे आहे. भारतातील युवकांमध्ये उद्योग आणि पैसा खेचून आणण्याची ताकद आहे.

‘देशाचे डरडोई उत्पन्न हे ७.४ टक्क्य़ांपर्यंत पोहोचले असून जगाचे लक्ष भारताच्या प्रगतीकडे आहे. भारतातील युवकांमध्ये उद्योग आणि पैसा खेचून आणण्याची ताकद आहे. युवाशक्ती आणि तंत्रज्ञान एकत्र आल्यास २१ वे शतक भारताचे असेल,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्यक्त केले.
चाकण येथील ‘जनरल इलेक्ट्रिक’च्या (जीई) ‘ब्रिलियंट फॅक्टरी’चे उद्घाटन शनिवारी झाले. या वेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आमदार शिवाजीराव अढळराव, अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा, जीईचे उपाध्यक्ष जॉन राइस, वनमाली अग्रवाल आदी उपस्थित होते.
या वेळी मोदी म्हणाले, ‘शेती, पायाभूत सुविधा, उत्पादन या क्षेत्रांमध्ये भारतात खूप संधी आहेत. या क्षेत्रांमध्ये देशांनी गुंतवणूक करावी. त्यांना काही अडचणी आल्यास सरकार पूर्ण मदत करेल. देशातील युवकांना कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या युवाशक्तीचे रूपांतर सक्षम मनुष्यबळात झाल्यास जगातील उद्योग आणि पैसा युवक भारताकडे आणतील. भारताला पुढे नेण्यासाठी रेल्वेची भूमिका मोठी आहे. रेल्वेतही गुंतवणूक होण्याची गरज आहे. संरक्षण क्षेत्रातही गुंतवणुकीसाठी संधी असून आपण सक्षम झाल्यावर तिसऱ्या जगातील देशांनाही आपण संरक्षण सामग्री निर्यात करू शकतो. त्यासाठी पुण्यात संरक्षण अभियांत्रिकीचे अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल.’
जीईच्या या ब्रिलियंट फॅक्टरीमध्ये ऑटोमेशन, इंडस्ट्रियल इंटरनेट, थ्रिडी प्रिंटिंगची सुविधा आहे. या केंद्राच्या दुसऱ्या टप्प्यांत विमानाची यंत्र सामग्री बनवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यापर्यंत दोनशे कोटी रुपये गुंतवणूक करण्यात आली आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ge electrics modi brilliant factory

ताज्या बातम्या