‘जेमकोव्हॅक १९’ लस उपलब्ध; भारतातील पहिली एमआरएनए लस, डीसीजीआयची मान्यता

करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एमआरएनए प्रकारातील ‘जेमकोव्हॅक १९’ या पहिल्या भारतीय लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली.

pv vaccine
‘जेमकोव्हॅक १९’ लस उपलब्ध

पुणे : करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी एमआरएनए प्रकारातील ‘जेमकोव्हॅक १९’ या पहिल्या भारतीय लशीला केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. पुणे येथील एमक्योअर फार्मास्युटिकल्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडने ही लस विकसित केली आहे. जगभरामध्ये मान्यता मिळालेली एमआरएनए प्रकारातील ही केवळ तिसरी लस ठरली.

२८ दिवसांच्या अंतराने दोन मात्रांच्या स्वरूपात ही लस घेता येणार आहे.  भारतासह जगातील अल्प आणि मध्यम उत्पन्न देशांच्या करोना महासाथीविरुद्ध लढय़ाला बळकटी देण्यासाठी लस पुरवठा करणे हे उद्दिष्ट असल्याचे जेनोव्हाकडून बुधवारी सांगण्यात आले. जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडचे मुख्य कामकाज अधिकारी समित मेहता यांनी याबाबत माहिती दिली.

एमआरएनए प्रकारातील लस असल्याने ‘सेल सायटोप्लाझ’मधील प्रथिनांच्या संरचनेत बदल करण्याच्या तिच्या अंतर्भूत क्षमतेमुळे या लशी अत्यंत प्रभावी आहेत. विषाणूच्या कोणत्याही विद्यमान आणि उदयोन्मुख प्रकारांसाठी लशीमध्ये आवश्यक बदल त्वरित करणे शक्य असल्याने भारतातील महासाथीचा सामना करण्यासाठी ही लस अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मेहता यांनी स्पष्ट केले. 

‘जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स’कडे सात दशलक्ष लस मात्रा तयार असून महिन्याला १२ ते १५ दशलक्ष मात्रांच्या निर्मितीची क्षमता असल्याचे कंपनीने सांगितले आहे. करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत वापरल्या जाणाऱ्या इतर लशींच्या तुलनेत ही लस कमी प्रमाणात टोचल्यानंतरही सारखेच संरक्षण देत असल्याने तिचे दुष्परिणामही कमी असल्याचे तीन टप्प्यांतील चाचण्यांमधून समोर आले आहे. सुमारे चार हजार निरोगी स्वयंसेवकांवर झालेल्या लशीच्या चाचण्यांमध्ये कोणत्याही गंभीर दुष्परिणामांची (साइड इफेक्ट) नोंद नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

२५ ते ३० देशांना प्रतीक्षा..

जेनोव्हाचे उद्दिष्ट दरमहा ४० ते ५० दशलक्ष लसमात्रा तयार करण्याचे असून ही क्षमता त्वरित दुप्पट करणे शक्य असल्याचे समित मेहता यांनी सांगितले आहे. लशीची किंमत इतर एमआरएनए लशींच्या किमतीशी तुलना करून निश्चित करण्यात येणार असून जगातील २५ ते ३० देश लशीसाठी संपर्कात असल्याचे जेनोव्हाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gemcovac 19 vaccine available india first mrna vaccine dcgi approved ysh

Next Story
राज्यसेवेसाठी नवे ३३ हजार अर्ज; ‘एमपीएससी’ने दिलेल्या मुदतवाढीचा उमेदवारांना लाभ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी