पुणे : भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी जनरल धीरज सेठ, उपप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, हे दोन्ही अधिकारी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातून (सदर्न कमांड) पदोन्नत झाले असून, एकाच ‘कमांड’मध्ये ‘आर्मी कमांडर’ (कमांड प्रमुख) म्हणून काम केलेले आहेत. एकाच कमांडचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले दोन अधिकारी एकाच वेळी लष्करप्रमुख, उपप्रमुखपदी असणे लष्कराच्या इतिहासातील दुर्मीळ घटना मानली जात आहे.

लष्करामध्ये एखाद्या कमांडचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्याला सामान्यतः ‘कमांडर’ म्हणून संबोधले जाते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे कमांडर म्हणून तत्कालीन लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी १ जुलै २०२४ ते ३१ मार्च २०२६ या काळात काम केले. त्यानंतर त्यांनी १ एप्रिल रोजी लष्कराचे ४९वे उपप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा सेवाकाळ संपुष्टात आल्यानंतर ३० जून रोजी जनरल सेठ यांनी ३१ वे लष्करप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. सेठ दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख असताना जून २०२५मध्ये लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांची दक्षिण मुख्यालयाचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून नियुक्ती झाली. सेठ यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदोन्नती झाल्यानंतर जैन यांच्याकडे दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख (आर्मी कमांडर) म्हणून सूत्रे आली. त्यांनी १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख म्हणून सेवा बजावली. त्यानंतर जैन यांनी ५०वे उपलष्करप्रमुख म्हणून १ जुलै रोजी पदाची सूत्रे स्वीकारली. एकाच कमांडचे प्रमुख म्हणून सेवा बजावलेले अधिकारी एकाच वेळी लष्करप्रमुख आणि उपप्रमुख पदावर कार्यरत असण्याची घटना दुर्मीळ आहे.

लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ आणि लेफ्टनंट जनरल संदीप जैन पुण्यातील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चे (एनडीए) माजी विद्यार्थी आहेत. चार दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी लष्करातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

एकाच कमांडमध्ये आर्मी कमांडर म्हणून काम केलेले दोन अधिकारी एकाच वेळी लष्करप्रमुख आणि उपप्रमुख होणे ही दुर्मीळ बाब आहे. यापूर्वी असे कधी घडल्याचे आठवणीत नाही. – लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (नि.)