निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा निर्वाळा

पुणे : जनरल रावत यांना घेऊन जाणारे एमआय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर भारतीय वायुदलाच्या ताफ्यातील सर्वांत अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. त्याची क्षमता पाहता १४ व्यक्तींसह उड्डाण करणे हे हेलिकॉप्टरसाठी मोठे आव्हान निश्चितच नव्हते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन उड्डाण करणारे वैमानिकही अत्यंत अनुभवी आणि कुशल असतात. त्यामुळे हेलिकॉप्टर किंवा वैमानिक यांच्या कुशलतेबाबत शंकाच नाही, असा निर्वाळा निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी बुधवारी दिला.

निवृत्त एअर मार्शल गोखले म्हणाले, भारतीय लष्कर, हवाईदल आणि नौदल या तिन्ही दलांमध्ये समन्वय निर्माण करण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदारीसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यात आले होते. जनरल रावत यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तिन्ही सैन्यदलांचे सक्षमीकरण, सैन्यदले आणि संरक्षण मंत्रालय तसेच भारत सरकार यांच्यामध्ये समन्वय निर्माण करणे यासाठी जनरल रावत यांचे प्रयत्न होते. त्यांच्या नियोजनाप्रमाणे सैन्यदलांचे सक्षमीकरण हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. सैन्यदलांचे प्रश्न, देशाच्या सीमारेषा आणि तेथील आव्हाने यांची सखोल जाण असलेला सैन्यदलांचा एक प्रमुख आणि उत्कृष्ट अधिकारी, पत्नीसह अशा अपघातात मृत्युमुखी पडणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

तांत्रिक बिघाडाची शक्यता… जनरल रावत यांच्यासारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन उड्डाण करताना हेलिकॉप्टर तसेच वैमानिकाचा दर्जा, अनुभव आणि कौशल्य यांबाबत कोणतीही तडजोड होणे शक्य नाही. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी याबाबत स्पष्ट सूचना (एसओपी) हवाईदलाच्या वैमानिकांना दिल्या जातात. त्यामुळे डोंगराळ भागातील हवामानामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाल्याचे स्पष्ट आहे, असेही निवृत्त एअर मार्शल गोखले म्हणाले.