दर वर्षी १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र भूगोल समितीचे संस्थापक-अध्यक्ष डाॅ. सुरेश गरसोळे यांनी १९८८ पासून ही प्रथा सुरू केली. या दिवसाचे महत्त्व जाणून घेण्याच्या निमित्ताने त्यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
भूगोल दिनाचे महत्त्व काय?
भूगोल हा दैनंदिन आयुष्यात अत्यावश्यक आणि अटळ असणारा विषय आहे. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आपण ज्या वस्तूंचा वापर करतो, त्या सर्वच वस्तू भूगोलातून मिळाल्याचे लक्षात येईल. मग त्या निरपेक्ष वृत्तीनेच आपण अन्न, वस्त्र, निवारा देणाऱ्या भूमातेचे म्हणजेच भूगोलाचे ऋण फेडणे आवश्यक आहे. त्यातून भूगोल दिन साजरा करण्याची कल्पना पुढे आली आणि आमच्या समितीमार्फत हा दिवस पुण्यात साजरा करण्यास सुरुवात झाली.
भूगोलशास्त्रज्ञ चंद्रशेखर धुंडिराज देशपांडे यांचा १४ जानेवारी हा जन्मदिवस. त्यामुळे हाच दिवस यासाठी योग्य वाटेल, असा आम्ही विचार केला. या दिवसाच्या निमित्ताने पर्यावरणरक्षणातून राष्ट्ररक्षण, तसेच प्रदूषण नियंत्रण, पर्यटनातून शिक्षण, नकाशानिर्मिती, तसेच नकाशांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्याबरोबरच निसर्ग-मानव सामंजस्य सहकार्य अशा संकल्पना प्रत्यक्षात आणणे आदी उद्देश यामागे आहेत.
दिवसेंदिवस पर्यावरणाची समस्या अधिक गंभीर रूप धारण करीत आहे. याआधी दिल्लीतील प्रदूषण वाढल्याची नोंद झाल्यानंतर आपण तसे निवांत होतो. पण, आता पुण्यातील प्रदूषणाच्या धोकादायक पातळीत वाढ होताना दिसत आहे. ही पातळी कमी करण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रदूषण पातळी धोक्याची होऊ नये म्हणून काय करायला हवे?
आपल्याकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कायमच ताशेरे ओढले जातात. अनेकदा ही परिस्थिती खरोखरच भीषण असते. पण, शक्य तेव्हा आपण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला हवा, असे मला वाटते. सहलीला जाताना अधिक मंडळींसाठी विविध वाहनांचा वापर करण्यापेक्षा एकच मोठे वाहन करणे सयुक्तिक होते, तसेच सिग्नलला वाहन थांबले असताना, त्याचे इंजिन बंद करणे, विजेचा अनावश्यक वापर टाळणे, ध्वनिप्रदूषण, तसेच हवा प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावणे आदी गोष्टी आपल्याला सहज करता येणे शक्य आहे. त्यातूनही अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील.
भूगोल समितीमार्फत कोणते उपक्रम राबविले जातात?
शालेय, महाविद्यालयीन आणि संस्थात्मक पातळीवर व्याख्याने, अनुभवकथन, प्रदर्शने, घोषवाक्य स्पर्धा, वृक्षपरिचय, आदिवासी जीवनदर्शन, भौगोलिक कोडी, भूगोल मित्र सन्मान, जिल्हा ते जग नकाशादर्शन, विशेषांक प्रकाशन, लघुपटनिर्मिती, भौगोलिक सहली आदींच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देऊन जनजागृती करण्याचे काम समितीमार्फत केले जाते. समितीने आजपर्यंत विविध भौगोलिक क्षेत्रे, नद्या, डोंगर, वने, उद्याने, धार्मिक-ऐतिहासिक स्थळे, पिके, शेतजमिनी आदी विषयांवर नकाशाची निर्मिती केलेली आहे.
सातत्याने या विषयाचा अभ्यास व्हावा म्हणून तुम्ही काय करता?
विविध प्रकारांच्या, आकारांच्या, रंगांच्या लहान-मोठ्या नकाशांनी नटलेला घरातला एक नकाशा कोपरा हे त्याच्यामागचे गुपित आहे. नवीन, तसेच जुन्या नकाशांचा हा कोपरा माझ्या जिव्हाळ्याचा, आवडीचा, रमणीय आणि उपयुक्त आहे. त्यात मी प्रयोगादाखल केलेल्या जिल्हा नकाशापासून जगाच्या नकाशापर्यंत वेगवेगळ्या विषयांचे नकाशे मी संदर्भासाठी, लेखनासाठी, सामान्यज्ञानाच्या वाढीसाठी लावून ठेवले आहेत आणि हा माझा छंद मी आज ऐंशीव्या वर्षीही जोपासतो आहे. मुख्य म्हणजे हा कोपरा अद्ययावत आणि समाजाभिमुख असा मी ठेवला आहे. तो मला तर ज्ञानसंपन्न करतोच, पण घरी येणाऱ्या मित्र, नातेवाइकांनाही मी तो नकाशा आवर्जून दाखवतो आणि त्यांच्या मनातील भूगोलविषयक शंकांचे निरसनही करतो.
shriram.oak@expressindia.com
