जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेला इंडियन मुझाहिदीनचा म्होरक्या यासीन भटकळ याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) न्यायालयाने साठ दिवसांची मुदतवाढ दिली. विशेष न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी हा आदेश दिला.
यासीन भटकळ याला ऑगस्ट २०१३ मध्ये नेपाळच्या सीमेवर अटक केल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्य़ात अटक केली होती. या गुन्ह्य़ात तो न्यायालयीन कोठडीत होता. भटकळवर आरोपपत्र दाखल करण्याची नव्वद दिवसांची मुदत १० जून रोजी संपत होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी या गुन्ह्य़ाचा आणखी तपास करायचा असल्यामुळे साठ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला होता. या गुन्ह्य़ातील फरार आरोपींचा शोध घ्यायचा असून इतर तपास करायचा आहे, असा युक्तिवाद अॅड. ठाकरे यांनी केला. एटीएसने केलेल्या तपासाची केसडायरी न्यायालयासमोर सादर केली. भटकळतर्फे अॅड. जहीर पठाण यांनी आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्यास विरोध केला. एटीएसने मुदतवाढ देण्याचा अर्ज केला असून कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केलेला नाही.
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ जणांचा मृत्यू आणि ५७ जण जखमी झाले होते. जर्मन बेकरीत मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये यासीन दिसून आला होता. त्याला अटक केल्यानंतर या गुन्ह्य़ात वर्ग करण्यात आले होते. या गुन्ह्य़ात त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्याची मुदत १० जून रोजी संपत होती.