इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी यासिन भटकळ याच्याकडे मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात तपास केल्यानंतर पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) ताब्यात घेणार आहे. त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी तपशील पुढे येण्याची शक्यता आहे, अशी माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.
बंगळुरु येथील बॉम्बस्फोटाचा तपास झाल्यानंतर बुधवारी मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्य़ात त्याला बुधवारी अटक केली. त्याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या बॉम्बस्फोटाचा तपास झाल्यानंतर भटकळला पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेतले जाणार आहे. त्यासाठी एटीएस अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. भटकळ याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
 पुण्यातील कोरेगावपार्क परिसरातील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार हा भटकळ असल्याचे तपासात पुढे आले होते. प्रत्यक्ष त्यानेच बेकरीमध्ये जाऊन बॉम्ब ठेवल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर जर्मन बेकरीच्या बॉम्बस्फोटाच्या दिवशीच दगडूशेठ गणपती मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा डाव त्याने रचल्याचे तपासात पुढे आले आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दहशतवाद विरोधी पथकाने एकमेव अटक आरोपी मिर्झा हिमायत बेग याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्य़ात मोहसीन चौधरी, रियाज भटकळ, इक्बाल भटकळ, फैय्याज कागझी आणि जबीउद्दीन अन्सारी हे आरोपी फरार आहेत. भटकळला ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर आणखी काही गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.