पुणे महापालिकेत आजवर नगरसेवक म्हणून काम केलेल्या माजी तसेच विद्यमान नगरसेवकांचे स्नेहमीलन दिवाळीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले असून या स्नेहमीलनात महापालिकेत काम केलेले काही माजी वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
आमदार आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गिरीश बापट, माजी महापौर अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांनी या आगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) सायंकाळी सहा वाजता हॉटेल पथिकजवळील सेंट्रल पार्क येथे हे स्नेहमीलन होईल. पुणे महापालिकेच्या स्थापनेपासून नगरसेवक म्हणून काम केलेल्यांची मोठी यादी आतापर्यंत तयार झाली असून महापालिकेतून निवृत्त झालेल्या तीस ते चाळीस अधिकाऱ्यांनाही कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे.
महापालिकेत विविध कालखंडात किंवा एकाच कालखंडात नगरसेवक म्हणून पती-पत्नी, पती-पत्नी-मुलगा, वडील-मुलगा, आई-मुलगा, सासरे-सून, सासरे-मुलगा-सून अशा एकाच कुटुंबातील सदस्यांनी काम केले आहे. त्यांचीही उपस्थिती या कार्यक्रमात असेल. त्यातील काही माजी नगरसेवक आहेत, तर काही विद्यमान आहेत. शशिकांत आणि रसिका सुतार व मुलगा पृथ्वीराज सुतार, बाळासाहेब आणि कविता शिवरकर व मुलगा अभिजित शिवरकर, उल्हास आणि कमल ढोले-पाटील, सुभाष आणि उषा जगताप, बाबू आणि वनिता वागसकर, अनिल आणि रेश्मा भोसले, दत्ता आणि संगीता गायकवाड, कैलास कोद्रे आणि महापौर चंचला कोद्रे (सासरे व सून), दत्तानाना बनकर, सुनील आणि वैशाली बनकर (सासरे, मुलगा व सून), रमेश बागवे व अविनाश बागवे, चंद्रकांत छाजेड व आनंद छाजेड, रंजना टिळेकर व योगेश टिळेकर या आणि अशा अनेक कुटुंबांमधील आजी-माजी नगरसेवकांना कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे.
पुण्यात नगरसेवक म्हणून काम केलेले अनेकजण पुढे आमदार तसेच खासदारही झाले. काहींना केंद्रीय, तर काहींना राज्य मंत्रिमंडळातही संधी मिळाली. अशांपैकी काहीजण देखील या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम पूर्णत: सांस्कृतिक संमेलन अशा स्वरूपाचा असून त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नसल्याचे काकडे यांनी सांगितले.