जुन्या काळातील ध्येयवाद, काळानुसार झपाटय़ाने बदलत गेलेली पत्रकारिता, त्यामुळे आलेली अस्थिरता अशा गोष्टींचा झालेला ऊहापोह आणि कारकिर्दीतील संस्मरणीय आठवणींचे कथन करीत ज्येष्ठ पत्रकारांचा स्नेहमेळावा रविवारी रंगला.
मराठी भाषा संवर्धन प्रतिष्ठानतर्फे आयोजित या स्नेहमेळाव्यात रामभाऊ जोशी, पं. वसंत गाडगीळ, विद्या बाळ, म. श्री. पगार, व. रं. देशपांडे, हेमंत जोगदेव, अशोक सिधये, कमलाकर पाठकजी, हरिश्चंद्र मिरजगावकर, फरीद शेख अमीर, ल. गो. शिवापूरकर, सहर जळगावी, एस. के. कुलकर्णी, एकनाथ बागूल, चंद्रकांत दीक्षित, सुरेश जोशी, जयराम देसाई, अशोक डुंबरे, हॅरी डेव्हीड, रंगनाथ माळवे यांना पुणेरी पगडी प्रदान करून गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, ‘केसरी’चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्यासह सर्व वृत्तपत्रांचे संपादक या वेळी उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांच्या कारकिर्दीतील संस्मरणीय आठवणी जागविल्या. प्रतिष्ठानचे सल्लागार उल्हास पवार यांनी गाडगीळ यांचीच मुलाखत घेऊन कार्यक्रमात रंग भरला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण वाळिंबे यांनी प्रास्ताविक केले. राजा महाजन, राज अग्रवाल, दीपक निकम, करुणा पाटील, नीना वाडेकर, सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.