पुणे : मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर आपले वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या घाशीराम कोतवाल या नाटकाचा यूटय़ूबवर प्रयोग रंगणार आहे. नाटकाला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने संगीत नाटक अकादमीतर्फे मूळ संचातील नाटकाचे दुर्मीळ चित्रीकरण उद्या (१६ डिसेंबर) सकाळी यूटय़ूबवर खुले करण्यात येणार असून, नाटय़प्रेमींसाठी मूळ संचातील प्रयोगाचे चित्रीकरण पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग थिएटर अ‍ॅकॅडमी या संस्थेतर्फे १६ डिसेंबर १९७२ रोजी सादर करण्यात आला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी हे नाटक दिग्दर्शित केले. भास्कर चंदावरकर यांनी नाटकाचे संगीत, कृष्णदेव मुळगुंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. या नाटकामुळे त्या काळी राजकीय वादही निर्माण झाला होता. मात्र मराठी नाटकाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची कामगिरी ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाने केली. सुरुवातीला झालेल्या विरोधानंतर गेल्या पन्नास वर्षांत भारतीय रंगभूमीवरील अभिजात कलाकृतीचा दर्जा या नाटकाने प्राप्त केला.

all the best marathi natak preview loksatta ravindra pathare
नाटयरंग : ‘ऑल दि बेस्ट’ – गजब ‘त्यांची’ अदा!
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Bohada look poster
५२ आठवडे, ५२ सोंग अन् त्यांचं अस्तित्व, दाक्षिणात्य निर्माते करणार मराठी चित्रपट ‘बोहाडा’ची निर्मिती
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?

दिल्लीत १९८९मध्ये झालेल्या नेहरू शताब्दी नाटय़ महोत्सवावेळी संगीत नाटक अकादमीने ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे चित्रीकरण करून ठेवले होते. हे चित्रीकरण आता नाटकाच्या सुवर्णमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्ताने खुले करण्यात येणार आहे. शुक्रवारी (१६ डिसेंबर) संगीत नाटक अकादमीच्या युटय़ूब वाहिनीवर या नाटकाचे दुर्मीळ चित्रीकरण पाहण्याची संधी नाटय़प्रेमींना मिळणार आहे. त्यामुळे  https://youtu.be/DuaTm7JWprA या दुव्याद्वारे ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा मूळ संचात चित्रीत केलेला प्रयोग शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता आणि पुढील तीन दिवस यूटय़ूबवर पाहता येईल.