घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी अरण येथून (ता. माढा, जि. सोलापूर) संत शिरोमणी सावतामहाराज साहित्य कृषी दिंडी २६ मार्च रोजी प्रस्थान ठेवणार आहे. प्रसिद्ध कवी नारायण सुमंत यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या दिंडीमध्ये लेखक-कवी, अभिनेते, लोककलावंत, प्रगतशील शेतकरी, प्रकाशक आणि साहित्य रसिक अशा अडीचशे जणांचा सहभाग आहे.
कवी नारायण सुमंत हे शेतकरी साहित्य इर्जिक (परिषद) महाराष्ट्र या संस्थेमार्फत ही दिंडी आयोजित करीत असून, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मोडनिंब शाखेचे प्रमुख कार्यवाह कवी सुरेशकुमार लोंढे आणि दिंडीमालक भारत शिंदे यांच्या मदतीने निघणारी ही दिंडी प्रथमच संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे संमेलनापूर्वी एक दिवस पोहोचणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी या दिंडीचे स्वागत केले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांची घुमान येथील व्यवस्था करण्यासंदर्भात संमेलनाच्या संयोजकांनी आनंदाने मान्यता दिली असल्याची माहिती नारायण सुमंत यांनी दिली.
सुमारे अडीच हजार किलोमीटरच्या प्रवासात ही दिंडी वाटेतील महत्त्वाच्या थांब्यांवर विविध सामाजिक विषयांवर जनजागर करणार आहे. औरंगाबाद, जळगाव, उज्जन, ग्वाल्हेर, मथुरा, आग्रा, दिल्ली, चंदीगड, अमृतसर आणि घुमान येथे ग्रामस्वच्छता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, व्यसनमुक्ती, स्त्री भ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन हे विषय पथनाटय़, कविसंमेलन, कथाकथन, भारूड, प्रवचन आणि परिसंवादाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्राबाहेर हे कार्यक्रम हिंदीतून करण्यात येणार असल्याचे सुमंत यांनी सांगितले. या दिंडीमध्ये ८२ महिला आणि मुलींचा सहभाग असून १४० युवकांचा समावेश आहे. घुमानच्या वाटेतील कृषी पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्फूर्तिस्थळांना भेटी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
 संत नामदेवनगरी
घुमान संमेलनाची तयारी जोरात सुरू असून संमेलन स्थळाचे संत नामदेवनगरी असे नाव देण्यात येणार आहे. मुख्य सभामंडपाला श्री गुरुनानकदेवजी सभामंडप असे नाव देण्यात येणार असून संमेलनाच्या व्यासपीठाला ‘लाल-बाल-पाल व्यासपीठ’ असे वैशिष्टय़पूर्ण नाव देण्यात आले आहे. याखेरीज गुरु गोविंदसिंहजी आणि बॅ. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ सभागृह अशी दोन सभागृहांची नावे असतील, अशी माहिती डॉ. माधवी वैद्य यांनी दिली.