गिरिप्रेमीची अन्नपूर्णा शिखर मोहीम लांबणीवर

नेपाळ सरकारच्या निर्बंधांमुळे निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणू संसर्गाचा फटका गिर्यारोहण क्षेत्रालाही बसला आहे. पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेची माऊंट अन्नपूर्णा २ ही शिखर मोहीम करोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेपाळ सरकारने घातलेल्या निर्बंधांच्या कारणास्तव गिरिप्रेमीने हा निर्णय घेतला आहे.

गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा मोहिमेचे नेते उमेश झिरपे यांनी याबाबत माहिती दिली. झिरपे म्हणाले, शनिवारी (१४ मार्च) सकाळी माऊंट अन्नपूर्णा २ शिखर मोहिमेसाठी निघण्याच्या दृष्टीने गिरिप्रेमीच्या संघाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, करोना संसर्गामुळे सर्वच देशांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांबाबत निर्णय जाहीर केले आहेत. नेपाळ देशही त्याला अपवाद नाही. गुरुवारी दिवसभर नेपाळ सरकारचे प्रतिनिधी, शेर्पा संघटनांचे प्रतिनिधी आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर यंदाच्या गिर्यारोहण मोहिमा रद्द करण्याचा निर्णय रात्री उशिरा जाहीर करण्यात आला.

नेपाळचे संपूर्ण अर्थकारण गिर्यारोहण मोहिमा आणि पर्यटन यांवर अवलंबून असल्याने स्थानिकांनी या निर्णयाबाबत नाराजी दर्शवल्याचे समजले. मात्र गिर्रारोहण मोहिमांसाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून नेपाळमध्ये येणारे गिर्यारोहक पहाता करोना संसर्गाचे संकट ओढवले तर त्याचा सामना करणे शक्य नाही, ही बाब ओळखून नेपाळ सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते, असेही त्यांनी सांगितले.

दोन ते तीन दिवसात नेपाळमधील गिर्यारोहण मोहिमांचा मोसम सुरू होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर नेपाळ सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गिरिप्रेमीचे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. उमेश झिरपे म्हणाले, नेपाळ सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या परवानग्या, बरोबर येणाऱ्या शेर्पाना दिलेली आगाऊ रक्कम, आवश्यक उपकरणे आणि अति उंचावर लागणाऱ्या खाद्यपदार्थासह सर्व गोष्टींवर सात ते आठ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र, नेपाळमध्ये जाऊन धोका पत्करण्यापेक्षा न जाण्याचा निर्णय घेतला आहे. संघ म्हणून हा निर्णय घेणे अवघड असले तरी या परिस्थितीत हाच निर्णय घेणे योग्य आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Giripremis annapurna summit expedites the campaign abn