गिरीश बापट सर्वसामान्यांमध्ये राहणारे होते. काल लोकसभेतील शिपायानेही त्यांच्या प्रकृतीबद्दल ‘गिरीशजी कैसे है? आप मिले क्या?’ अशी चौकशी केली. त्याचे कारण बापट लोकसभेतील शिपायांना पुण्यातून मिठाई, बाकरवडी नेऊन वाटायचे, अशी आठवण सांगताना खासगार श्रीनिवास पाटील यांना हुंदका आवरला नाही.
खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन झाले. त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. श्रीनिवास पाटील आणि गिरीश बापट यांचा अनेक वर्षांचा परिचय आहे. पाटील सनदी अधिकारी असल्यापासून ते लोकसभेत सहकारी म्हणून त्यांनी एकत्र काम केले आहे. बापट यांच्या निधनाचे वृत्त कळताच पाटील यांनी दिल्लीहून पुणे गाठले आणि बापट यांचे अंत्यदर्शन घेतले.
हेही वाचा >>>पुणे: शासकीय कर्मचाऱ्यांची संप काळातील अनुपस्थिती असाधारण रजा म्हणून नियमित; राज्य शासनाचा निर्णय
बापट यांच्या आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले, की पुण्यात मी जिल्हाधिकारी म्हणून काम करताना बापट यांनी नगरसेवक म्हणून कारकीर्द सुरू केली. कसब्यातील कोणाचे काम असेल, किंवा विस्तारणाऱ्या कोथरूडमधील काही काम असेल, तर बापट ते सांगायचे आणि आम्ही करायचो. बापट नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जायचे. पक्षविरहित काम करायचे. अनेकदा आमदार, खासदार होऊनही ते सामान्यांच्या संगतीत असायचे. गोरगरीबांच्या खांद्यावर हात ठेवायचे, अशी आठवणही पाटील यांनी सांगितली.