उजव्यांमधला डावा, अशी ओळख असणाऱ्या गिरीश बापट यांनी आयुष्यभर सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, सर्वजातीय मैत्री केली. ती मैत्री राजकारणाने डागाळली जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्यामुळेच राजकारणापेक्षा समाजकारण हा त्यांचा खरा पिंड होता. गेल्या काही वर्षांत राजकारणात जात धर्म यांना आलेले महत्त्व गिरीश बापटांना जराही शिवले नाही, याचे हे कारण. पक्ष म्हणून असलेली शिस्त पाळतानाही, आपल्या स्वभावाला मुरड किती आणि कशी घालायची, याबद्दलचे त्यांचे बरोबर आडाखे असत. ऐंशीच्या दशकात तारुण्यात बापटांनी राजकारणात प्रवेश केला. पक्षातल्या ज्येष्ठांबरोबरही त्यांची टवाळी करता येईल, इतकी जवळीक साधण्याची कला त्यांना अवगत होती. पक्षातल्या ज्येष्ठांचा मान राखतानाही, नव्याने अनेक युवकांना पक्षात येण्यास प्रवृत्त करण्यासाठी बापट सतत प्रयत्नशील असत. आपल्या सहकाऱ्यांना सगळ्या अडीअडचणीत मदत मागता येईल, असा विश्वास त्यांनी संपादन केला होता. सकाळपासून स्कूटरवर बसून शहरभर भ्रमंती करत समाजकारण करत जगमैत्री करण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळे प्रत्येकाला ते आपले खरे मित्र आहेत, असे वाटे. ते बहुतेकवेळा खरेही असे.

राजकारणात उडत्या पक्ष्यांचे पंख मोजायचा जो ध्यास असावा लागतो, तो बापटांपाशी होता. त्यामुळे नगरसेवकपदापासून ते खासदारकीपर्यंत सतत चाळीस वर्षे अटीतटीच्या स्पर्धात्मक राजकारणात पाय रोवून उभे राहण्याची किमया त्यांना करता आली, ती केवळ त्यांच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे. राजकारणातील शत्रूला पाणी पाजण्यासाठीची व्यूहरचना करण्यात ते जसे माहीर होते, तसेच पक्षांतर्गत चढाओढीतही सतत केंद्रस्थानी राहण्यासाठी जे काही करावे लागते, त्यात ते तरबेज होते. अलीकडच्या काळात पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचे लक्षात येताच, त्यांनी आपला तिखटपणा जराही कमी होऊ न देता, पक्षातील नेत्यांची कानउघाडणी केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खासदारकीची उमेदवारी मिळण्याची खात्री असतानाही, त्यांना डावलल्याने ते प्रचारातही सहभागी होईनासे झाले. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि निवडणुकीतले साम, दाम, दंड, भेदाचे मार्ग यांचा पुरेपूर अनुभव असल्याने त्यांना मनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. नंतर मात्र त्यांनी भाजपाचा उमेदवार निवडून येण्यासाठी कसोशी केली. त्याचे बक्षिस म्हणजे नंतर राज्यात भाजपा-सेनेची सत्ता आल्यावर कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी. कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाला त्यांच्या मदतीची इतकी गरज भासू लागली, की त्यांना जाहीर व्यासपीठावर आणून, त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी पक्षातील नेत्यांना फार कष्ट करावे लागले. पुण्याची राजकीय, सामाजिक नाडी ओळखणाऱ्या बापटांना शहराच्या राजकारणात दबदबा निर्माण करता आला, तो त्यांच्या दांडग्या संपर्कामुळे.

loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

हेही वाचा – गिरीश बापटांच्या निधनाने सर्वसमावेशक नेतृत्व हरपलं, अजित पवारांनी व्यक्त केला शोक

गिरीश बापट आणि पुणे हे भारतीय जनता पक्षासाठी अनोखे समीकरण होते. गिरीश बापट यांनी जवळपास तीन दशके कसबा मतदारसंघाचे नेतृत्व केले. तर, सध्याचे पुणे शहराचे ते विद्यमान खासदार होते. सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध असणारा नेता अशी गिरीश बापट यांची ओळख आहे. नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या बापट यांनी १९९५ पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. १९९६ मध्ये त्यांना भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली होती. मात्र, बापट यांना काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते.

मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले बापट जनसंघापासून राजकारणाशी जोडलेले होते. आधी नगरसेवक म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली होती. स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. कसब्यातून पहिल्यांदा पोटनिवडणुकीमध्ये त्यांना काँग्रेसचे वसंत थोरात यांच्याकडून पराभूत व्हावे लागले. मात्र, १९९५ पासून ते सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा पराभव करून ते खासदार झाले होते. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण तळेगाव दाभाडे येथे, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत झाले होते. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून (बीएमसीसी) वाणिज्य शाखेची पदवी संपादन केल्यानंतर १९७३ मध्ये त्यांनी टेल्को कंपनीमध्ये नोकरी केली. आणीबाणीमध्ये दीड वर्ष त्यांनी तरुंगवास भोगला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी संघ परिवारामध्ये वेगवेगळ्या पदावर काम केले.

हेही वाचा – VIDEO : “जमिनीशी नाळ असलेलं राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपलं”, गिरीश बापट यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली!

पुणे महापालिकेची निवडणूक लढवून १९८३ मध्ये बापट पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढे तीनदा नगरसेवक म्हणून निवडून आले. बापट यांचा जनसंपर्क मोठा होता. १९९५ पासून सलग पाचवेळा ते आमदार म्हणून निवडून आले होते. १९९६ मध्ये त्यांना लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली होती. पण पहिल्याच प्रयत्नात त्यांना काँग्रेसचे नेते सुरेश कलमाडी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर २०१४ मध्ये पक्षाने गिरीश बापट यांच्याऐवजी अनिल शिरोळे यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली होती. त्यावेळी बापट यांची संधी हुकली असली तरी २०१९ मध्ये काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांचा तब्बल ९६ हजार मतांनी पराभव करत बापट खासदार झाले होते.

राज्यात २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले त्यावेळी त्यांना मंत्रिपदासोबत पुण्याचे पालकमंत्रिपदही देण्यात आले होते. गेली पाच वर्षे त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दांडगा जनसंपर्क असणाऱ्या बापट यांची कसबा मतदारसंघावर मोठी पकड होती. त्यामुळेच ते खासदार झाल्यानंतर स्वर्गीय मुक्ता टिळक यांनाही सहजगत्या विजय संपादन करता आला होता.