पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हुकूमशाही पद्धतीने पुणेकरांच्या हक्काचे पाणी दौंड आणि इंदापूरला सोडण्याचा निर्णय घेतल्याची टीका महापालिका सर्वसाधारण सभेत मंगळवारी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सभागृहात आंदोलन करुन बापट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मनसेचे सदस्यही त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या निषेध करुन सभा तहकूब करण्यात आली.
पुणेकरांच्या हक्काच्या पाण्यामधून दौंड आणि इंदापूरला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला असून त्याचे पडसाद मंगळवारी पालिका सभेत उमटले. सभेचे कामकाज सुरू होताच सभागृहनेता शंकर केमसे, काँग्रेसचे गटनेता आणि विरोधी पक्षनेता अरिवद िशदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी ‘पालकमंत्र्यांचा निषेध असो’ अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली.
पाणी सोडणाच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक घेऊन या पक्षांचे नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर आले. हे आंदोलन सुरू होताच भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सदस्यही महापौरांच्या आसनासमोर आले. त्यानंतर या पक्षांची परस्परांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा निषेध करत सभा तहकूब करण्याचा ठराव काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सभेत मांडला. या ठरावाला भाजपने विरोध केला. विरोध झाल्यामुळे त्यावर मतदान घेण्यात आले. अखेर बहुमताने सभा तहकूब करण्यात आली.
‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकारण’
पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परंतु, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच मनसे या पक्षांकडून या विषयात राजकारण केले जात असल्याचा आरोप भाजपचे गटनेता गणेश बिडकर आणि नगरसेवक अशोक येनपुरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.
‘पालकमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’
पुणे- महाराष्ट्रात अभूतपूर्व दुष्काळ पडला असताना आणि पाण्याचा थेंब न थेंब वाचविणे गरजेचे असताना पालकमंत्री गिरीश बापट यांनी कालवा समितीची बठक न बोलावता तसेच पुण्यातील एकाही आमदाराला आणि महापालिका आयुक्तांना विश्वासात न घेता खडकवासला धरणातून एक टीएमसी पाणी दौंड व इंदापूरसाठी कालव्यातून सोडण्याचा मनमानी निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पुण्याच्या पालकमंत्रिपदी राहण्याचा कोणताही नतिक अधिकार शिल्लक नाही, अशी टीका सजग नागरिक मंचने केली आहे.
खडकवासला धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर टीका करणारे पत्र सजग नागरिक मंचच्या वतीने अध्यक्ष विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. लोकप्रतिनिधींची बठक न बोलावता घेण्यात आलेला हा निर्णय लोकशाहीचा गळा घोटणारा आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दौंडच्या पिण्याच्या पाण्याची साठवण क्षमता ४५ कोटी लिटर असून पुढे इंदापूपर्यंत आणखी ५५ कोटी लिटर पाणी पुढील दोन महिने पिण्यासाठी देणे आवश्यक आहे, असे गृहित धरले तरी १०० कोटी लिटर पाणी देण्यासाठी एक हजार कोटी लिटर पाणी सोडणे म्हणजेच ९०० कोटी लिटर पाणी कालव्यातील वहन व्ययात वाया घालविणे आताच्या परिस्थितीत अक्षम्य आहे, याकडेही सजग नागरिक मंचने लक्ष वेधले आहे. पुण्यातून एक टीएमसी पाणी सोडून ते इंदापूपर्यंत पोहोचणार नाही, हे पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांचे मत डावलून पाणी सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी घेतला आहे. इंदापूरला उजनी धरण भौगोलिकदृष्टय़ा जवळ असल्याने वहन व्यय वाचविण्यासाठी उजनी धरणाच्या अचल साठय़ातून इंदापूरला पाणीपुरवठा करावा या तज्ज्ञांच्या मताला किंमत न देता आणि जूनअखेर पालखीसाठी आणखी ०.५ पाणी सोडावे लागेल हे निदर्शनास आणून त्याकडेही दुर्लक्ष करून पालकमंत्र्यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचा मनमानी निर्णय केला असल्याटी टीका सजग नागरिक मंचने केली आहे. पालकमंत्र्यांनी कालव्यातून पाणी सोडण्याचा घातक निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पुण्याच्या पालकमंत्रिपदी राहण्याचा कोणताही नतिक अधिकार शिल्लक नाही. पुणेकरांचे अहित करणाऱ्या आणि मनमानी निर्णय घेणाऱ्या बापट यांना पालकमंत्रिपदावरून दूर करावे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.