scorecardresearch

पुणे: गिरीश बापट अनंतात विलीन

पोलीस घोष पथकाने सुरावटीतून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांनी दिलेली मानवंदना, मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून केलेले अभिवादन अशा शोकाकूल वातावरणात खासदार गिरीश बापट अनंतात विलीन झाले.

grish bapat गिरीश बापट
गिरीश बापट अनंतात विलीन

पोलीस घोष पथकाने सुरावटीतून आणि बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलिसांनी दिलेली मानवंदना, मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून केलेले अभिवादन अशा शोकाकूल वातावरणात खासदार गिरीश बापट अनंतात विलीन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी अनेकांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

खासदार गिरीश भालचंद्र बापट (वय ७२) यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी दुपारी खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यानंतर दुपारी त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील अमेय अपार्टमेंट या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह राजकीय, समाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, गणेश मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शन घेणाऱ्यांची रांग शेवटपर्यंत होती.

हेही वाचा >>>पुणे: शासकीय कर्मचाऱ्यांची संप काळातील अनुपस्थिती असाधारण रजा म्हणून नियमित; राज्य शासनाचा निर्णय

फुलांनी सजविलेल्या उघड्या वाहनातून बापट यांच्या अंत्ययात्रेला सायंकाळी पाच वाजता सुरुवात झाली. ओंकारेश्वर मंदिर, रमणबाग चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे अंत्ययात्रा वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचली. पोलीस दलाच्या वतीने मानवंदना दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पुष्पचक्र अर्पण केले. पार्थिव लपेटलेला तिरंगा कुटुंबीयांकडे सुपूर्त केल्यानंतर बापट यांच्या पार्थिवावर विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 21:22 IST

संबंधित बातम्या