लोणावळा : लोणावळा परिसरात एका बंगल्यातील जलतरण तलावात बुडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी घडली. हानियाझैरा मोहम्मददिन सैय्यद असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत हानियाझैराचे वडील मोहम्मददिन (वय ३१, रा. डोंबिवली, जि. ठाणे) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सैय्यद कुटुंबीय आणि नातेवाईक लोणावळ्यात पर्यटनासाठी आले होते. लोणावळ्यातील प्रिसली हिल भागात त्यांनी मिर्जा बंगला भाडेतत्वावर घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी सकाळी सैय्यद कुटुंबीय बंगल्यात नाश्ता करत होता. त्या वेळी बंगल्यातील जलतरण तलावाच्या परिसरातून ओरडण्याचा आवाज आला. सय्यद कुटुंबीयांनी जलतरण तलावाच्या दिशेेने धाव घेतली. तेव्हा तलावातील पाण्यात हानियाझैरा पडल्याचे आढळून आले. तिला पाण्यातून बाहेर काढून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. तिच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मूत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुजावर करत असून चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: पुणे: कोरेगाव पार्क, लोहगावमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

सहा महिन्यात तीन बालकांचा मृत्यू

लोणावळा परिसरातील बंगल्यात जलतरण तलावात बुडून बालकांचा मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. पुणे-मुंबईतील अनेक पर्यटक सुट्टीत लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येतात. लोणावळा भागातील बंगले भाडेतत्वावर घेण्यात येतात. बंगल्यातील सुरक्षाव्यवस्थेकडे बंगला मालक फारसे लक्ष देत नाहीत. सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे काणाडोळा केल्याने जलतरण तलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्याने लोणावळा शहर पोलिसांनी बंगला मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले हाेते.

हेही वाचा: राज्यात थंडीच्या हंगामातील उकाडा; मोठ्या पावसाची शक्यता नाही

जलतरण तलाव बेकायदा

लोणावळा भागात मुंबई-पुण्यातील अनेकांचे बंगले आहेत. लोणावळा परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना बंगले भाडेतत्वावर देण्यात येतात. बंगल्यात जलतरण बांधण्याची परवानगी नगरपरिषदेकडून मिळवावी लागते. लोणावळ्यातील अनेक बंगले मालकांनी जलतरण बांधण्यास परवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl dies after drowning in bungalow swimming pool in lonavala tmb 01
First published on: 27-11-2022 at 17:21 IST