पिंपरी चिंचवड मध्ये एका नऊ वर्षांच्या मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचे नाव यशोधरन गोपाल (५४) असे आहे. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय हे पिंपरी येथील एका चाळीत राहतात. आरोपी यशोधरन गोपाल हा त्याच चाळीतील भाड्याच्या खोलीत राहत होता. पोलीस चौकशीदरम्यान, आपण यापूर्वीही पीडित मुलीवर दोन ते तीन वेळेस लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली आहे. यावेळीदेखील त्याने पीडित मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून  तिच्यावर अत्याचार केले. मात्र, हे कृत्य करत असताना शेजारील एका महिलेने बघितले. त्यामुळे ही गंभीर बाब उघडकीस आली. सध्या पोलिसांनी यशोधरन गोपालला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डॉ. मुगळीकर यांनी दिली.