पिंपरी-चिंचवडमध्ये एका मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून या मुलीने आत्महत्या केल्याचे समजते. अनिषा ठकुरे असे या विद्यार्थीनीचे नाव आहे. मुलीच्या मृत्यूनंतर अनिषाच्या आईने हळहळ व्यक्त करताना शिक्षण व्यवस्थेतील आरक्षणच काढून टाका, अशी मागणी केली आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिषाने काल तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. अनिषाला दहावीत ७० टक्के गुण मिळाले होते. मात्र, तरीही तिला अकरावीसाठी कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे अनिषा खूप निराश झाली होती. याच नैराश्यातून तिने काल राहत्या घरी गळफास घेतला. अनिषाला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिने पुण्यातील तब्बल नऊ महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन अर्ज केला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये लागलेल्या सात प्रवेश याद्यांमध्ये तिचा क्रमांक लागू शकला नव्हता. त्यामुळे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती तिला सतावत होती. याच नैराश्यातून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
अनिषाच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशा परिस्थितीमध्येही तिने दहावीपर्यंतचे शिक्षण नेटाने आणि उत्तमरित्या पूर्ण केले होते. तिला भविष्यात कलेक्टर व्हायचे होते. मात्र, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील घोळामुळे तिच्या महाविद्यालयीन प्रवेशावरच टांगती तलवार होती. दरम्यान, पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.