पुणे : घरचे ऐकत नाहीत म्हणून विवाहास दिलेला नकार जिव्हारी लागल्यानंतर प्रियकराचे अपहरण करणाऱ्या प्रेयसीसह सातजणांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्या सर्वांना ३० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अपहरण झालेल्या युवकाची अवघ्या चार तासांत माजलगाव येथून सुटका करण्यात आली.
सोनाली बालाजी निर्वाळ (वय २७), सुदाम माणिक ताठे (वय २३), शेख सोहेल शेख अफसर (वय २१), देवीदास भगवान पांजगे (वय २१), वैभव मिलिंद शेळके (वय २२), सारंग भगवानराव काकडे (वय ३३), प्रसाद बंडू गवळी (वय २७, सर्व रा. परभणी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने ३० मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी अपहरण झालेल्या युवकाच्या भावाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोटारीतून काही लोकांनी भावाचे अपहरण केल्याची तक्रार देण्यात आली. हा प्रकार समजताच लोणीकंद पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा माग काढण्यास सुरूवात केली. स्वतः पोलिस आयुक्त अमितेशकुमार या घटनेवर लक्ष ठेवून होते. गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पाच पथके आरोपीचा शोध घेत होती. तांत्रिक तपासात पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी अपह्रत व्यक्तीला बीड जिल्ह्यात घेऊन निघाले आहेत. त्यानुसार पुणे पोलिसांनी बीड, नांदेड आणि परभणी पोलिसांच्या मदतीने युवकाची सुटका केली.
‘सोनालीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असल्याने लग्नासाठी नकार दिला होता. त्याच कारणातून सोनालीने आपल्या गावकडील साथीदारांना बोलावून घेत मारहाण करून त्याचे अपहरण केले. यावेळी सोनाली स्वतः इतर आरोपींसोबत मोटारीत होती. गावी घेऊन जाऊन न्यायालयात विवाह करणार होती,’ अशी माहिती अपहरण झालेल्या युवकाने दिली.
या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी सोनालीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपायुक्त गोहर हसन, प्रशांत अमृतकर, राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, स्वाती खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी, उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे, तुकाराम सुरवसे, कर्मचारी कैलास साळुंके, सागर जगताप, रीतेश काळे, तुषार पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
