देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकवा, असे आवाहन महिला बालकल्याण व ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी िपपरीत बोलताना केले.
भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत भोसरी, आकुर्डी व रहाटणी येथे झालेल्या तीन स्वतंत्र मेळाव्यात त्या बोलत होत्या. आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, संघटनमंत्री व्ही. सतीश, रवी अनासपुरे, वसंत वाणी, एकनाथ पवार, सिध्दार्थ शिरोळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, भाजप हा अधिकाधिक आमदार व खासदार देणारा पक्ष आहे. स्थानिक निवडणुकीत आपण कमी पडतो. तेथे सत्ता मिळायला हवी. नेत्यांना सत्तेत सहभाग मिळाला, आता कार्यकर्त्यांची वेळ आहे. विविध पदांवर संधी देण्यासाठी त्यांना बळ देण्याची गरज आहे. शिजेपर्यंत थांबला, निवेपर्यंतही थांबा. १५ वर्षे तुम्ही कष्ट घेतले, सत्ता तुमची आहे. चलबिचल करू नका, सकारात्मक रहा. लाभाची नव्हे तर जनतेची कामे करून घ्या. इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे. सर्वार्थाने विकास करणारे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने लाभले आहे. प्रास्तविक सदाशिव खाडे यांनी केले. राजू दुर्गे यांनी सूत्रसंचालन केले.
‘सेल्फी, व्हॉट्स अप, फेसबुकपेक्षा कामाकडे लक्ष द्या’
सत्कार थांबवा, हार-तुरे देणे बंद करा. अनावश्यक प्रसिध्दीचे तंत्र माझ्याबाबतीत वापरू नका. ‘सेल्फी, व्हॉट्स अप आणि फेसबुकपेक्षा सदस्यनोंदणी करा, कामावर लक्ष द्या. सत्कारावर खर्च करू नका, तो निधी राज्य शासनाच्या मुलींसाठी असलेल्या योजनांसाठी द्या. माझ्यासोबत फोटो काढायचे असतील तर अधिकाधिक सदस्यनोंदणी करा, अशी टिप्पणी पंकजा मुंडे यांनी मेळाव्यात बोलताना केली.