नारायणगाव : ‘लहरी हवामानाचा शेती उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत आहे. त्यावर प्रभावी उपाय शोधण्यासाठी कृषी शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठे आणि शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अभ्यास करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पिकाची योग्य मूल्यसाखळी विकसित झाली तरच शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक मोबदला मिळू शकेल, असे मत राज्याचे माजी कृषी सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी व्यक्त केले.

ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव आयोजित ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२६’ अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन आणि पीक परिसंवाद कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी गोयल बोलत होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, माजी संचालक डॉ. सुदाम अडसूळ, डॉ. जी. के. ससाणे, पुजा बुट्टे पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, सहकार्यवाह अरविंद मेहेर, उपकार्याध्यक्ष डॉ. आनंद कुलकर्णी, संचालक तानाजी वारुळे, आल्हाद खैरे, सोमजीभाई पटेल, डॉ. संदीप डोळे, रत्नदीप भरवीरकर, ऋषिकेश मेहेर, देविदास भुजबळ, एकनाथ शेटे, देवेंद्र बनकर, सुखदेव बनकर, नीलेश पाटे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांच्यासह शेतकरी या वेळी उपस्थित होते.

डॉ. गोयल म्हणाले, ‘कृषी विमा योजना आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) असूनही शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उत्पादन ते ग्राहक अशी मूल्यसाखळी सक्षमपणे उभारणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सरकार, शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.‘

शेतकरी ते ग्राहक थेट मूल्यसाखळी उभारण्यावर भर देत दांगट यांनी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर स्वागतार्ह असल्याचे सांगितले. मात्र, नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. मायंदे यांनी माती व पाण्याच्या गुणवत्तेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. सेंद्रिय शेती वाढवणे, सिंचन पाण्याचा दर्जा सुधारणे आणि पोषणबागांमधून रसायनमुक्त फळभाजी उत्पादन करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्रांनी देश-विदेशातील तंत्रज्ञानाची चाचणी स्थानिक हवामान व जमिनीनुसार करावी. तसेच शेतकऱ्यांना केवळ उत्पादनवाढ नव्हे तर खर्च-नफा यावर आधारित कृषी सल्ला देण्याची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

‘हवामान बदलामुळे होणाऱ्या नुकसानीवर मात करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, माती व पानदेठ परीक्षणावर आधारित कृषिसल्ला, तसेच महिला व युवकांसाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षणावर भर देण्यात येत आह”, असे मेहेर यांनी सांगितले.  

कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे, डॉ. सुयोग खोसे आणि भरत टेमकर यांनी लिहिलेल्या घडीपत्रिकांचे प्रकाशन तसेच ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले.