पुणे : वारकऱ्यांसह शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लाडके दैवत असलेल्या सावळ्या विठुरायाचे मंदिर सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंडमध्ये साकारण्यात येणार आहे. लंडनहून पंढरपूरकडे निघालेल्या ‘ग्लोबल वारी’चे पुण्यात स्वागत करण्यात आले. त्यावेळी ‘ग्लोबल वारी’चे प्रमुख अनिल खेडकर यांनी ही घोषणा केली.

आपल्या संतांची शिकवण आणि वारीची परंपरा हा वारसा पुढे नेण्यासाठी इंग्लंडमधील काही मराठी मंडळींनी या वर्षीपासून सुरू केलेली ग्लोबल वारी बुधवारी पुण्यात पोहोचली. त्यावेळी आयटी दिंडीच्या वतीने या वारीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लंडन ते पंढरपूर असा मार्ग असलेली ही वारी युरोपमधील अनेक देशांमध्ये जाऊन शेवटी मुंबईत आणि पुढे पुण्यात पोहोचली. वारीसमवेत मार्गक्रमण करून ही ग्लोबल वारी पुढे पंढरपूरपर्यंत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणार आहे. पंढरपूर ते लंडन अशी परतवारी होणार आहे.

पुण्यातील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील तंत्रज्ञांनी एकत्र येवून ‘आयटी दिंडी’ सुरु केली आहे. दरवर्षी ते आळंदी ते पुणे आणि वारीसोबत व पुढे पंढरपूरपर्यंत जातात. यात माहिती तंत्रज्ञान, बीपीओ किंवा इतर क्षेत्रातील कोणीही भाग घेवू शकतात. ती अधिक सर्वसमावेशक व्हावी म्हणून त्यांनी ‘एआय’ दिंडी असे नाव घेतले आहे. या आयटी दिंडीच्या वतीने ‘ग्लोबल वारी’तील वारकऱ्यांचे पुण्यात स्वागत करण्यात आले.

‘आपल्या पंढरपूर वारीचा वारसा युरोपमध्ये देखील अनुभवायला मिळावा म्हणून आम्ही ‘ग्लोबल वारी’ सुरू केली. आमच्या सोबत इंग्लंड व युरोपमधील मधील अनेक भागवत भक्त आहेत सुरुवात असल्याने आम्ही सहभागी वारकऱ्यांची संख्या मर्यादित ठेवली आहे, पण हळूहळू ती पुढे वाढवत नेऊ,’ असे ‘ग्लोबल वारी’चे प्रमुख अनिल खेडकर यांनी सांगितले.

‘हिंसा, द्वेष आणि दहशतवादाने ग्रस्त मानवाला ‘विश्वात्मके देवे’ म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर माउलींच्या व संतांच्या उपदेशातून मांडलेल्या वैश्विक ऐक्याची अनुभूती ‘ग्लोबल वारी’ सारख्या माध्यमातून सगळ्यांना मिळेल. जगात शांतता नांदण्यासाठी त्याचा अधिक परिणाम होईल. म्हणून ‘ग्लोबल वारी’च्या सगळ्या वारकऱ्यांचे अभिनंदन,’ अशी भावना असे आयटी दिंडीचे समन्वयक राजेश पाटील यांनी व्यक्त केली.

‘वारीत चालतांना स्वच्छतेचे, आरोग्याचे तसेच पर्यावरणाचं भान ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पर्यावरण गतिविधी’चे ऋत श्रीवास्तव यांनी ग्लोबल वारीचे स्वागत करताना केले. ‘ग्लोबल वारी’चे अनिल खेडकर, दिनेश केदारी, प्रविण ढाकणे, किरण लष्करे तसेच आयटी दिंडीचे राजेश पाटील, नितीन फाटक, संतोष कोंपलवार, कौशल मार्कंडेय या वेळी उपस्थित होते.