पुणे : खोडद येथील अद्ययावत ‘जीएमआरटी’ (यूजीएमआरटी) या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी दुर्मीळ न्यूट्रॉन ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या अतितीव्र रेडिओ लहरींचा शोध घेतला आहे. एका सेकंदात ५९२ वेळा स्वतःभोवती फिरणारा हा तारा असून, या संशोधनामुळे येत्या काळात न्यूट्रॉन तारे अत्यंत तेजस्वी, वेगवान रेडिओ लहरी कशा निर्माण करतात, याचा अभ्यास करणे शक्य होणार आहे.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील (एनसीआरए) सप्तर्षी सरकार, मार्गदर्शक डॉ. जयंता रॉय यांच्यासह अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनमधील खगोलशास्त्रज्ञांनी या संशोधनात योगदान दिले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. शास्त्रज्ञांनी ‘पीएसआरजे १२२७-४८५३’ या न्यूट्रॉन ताऱ्याचे निरीक्षण केले. हा न्यूट्रॉन तारा ‘ट्रांझिशनल मिलिसेकंद पल्सार’ आहे. म्हणजेच हा तारा त्याच्या नजीकच्या ताऱ्यातील पदार्थ स्वत:कडे खेचून घेतो आणि वेगाने फिरणारा रेडिओ पल्सार म्हणून चमकणे, या दोन अवस्थांमध्ये सतत बदलत असतो. या प्रक्रियेत ताऱ्यामधून प्रचंड क्षमतेच्या रेडिओ लहरी बाहेर पडतात. शास्त्रज्ञांनी १७४ तास या ताऱ्याचा अभ्यास करून २३५ महाकाय रेडिओ लहरींचा शोध लावला आहे.

संशोधक सप्तर्षी सरकार म्हणाले, ‘ताऱ्यातून येणाऱ्या रेडिओ लहरी सामान्य लहरींपेक्षा १० हजार पटींनी अधिक तेजस्वी होत्या. सर्वांत लहान रेडिओ लहर अवघी १.२८ मायक्रोसेकंद टिकली. हा कालावधी मानवी डोळ्याची पापणी लवण्याच्या वेळेपेक्षा तब्बल १ लाख पटींनी कमी आहे. रेडिओ लहरी ताऱ्याच्या दोन्ही ध्रुवांऐवजी केवळ एकाच चुंबकीय ध्रुवावरून उत्सर्जित होत असल्याचे दिसून आले. तसेच, या लहरी शांततेच्या काळानंतर अचानक एका मोठ्या समूहात येतात. हा आकृतिबंध आपल्या आकाशगंगेच्या बाहेरून येणाऱ्या ‘फास्ट रेडिओ बर्स्टस्टॉर्म’सारखाच आहे. मात्र, त्यामुळे वेगवेगळ्या दिसणाऱ्या वैश्विक रेडिओ लहरींमागील भौतिकी नियमांमध्ये काही समान दुवे असू शकतात, अशी रंजक शक्यता यातून निर्माण झाली आहे.’

न्यूट्रॉन तारे समजून घेण्यासाठी उपयुक्त

‘अद्ययावत ‘जीएमआरटी’ची उच्च संवेदनशीलता, मायक्रोसेकंद वेळेची अचूकता आणि दीर्घकालीन निरीक्षण मोहीम राबवण्याच्या क्षमतेमुळेच हे संशोधन शक्य झाले. वेगाने फिरणारे न्यूट्रॉन तारे अत्यंत तेजस्वी, वेगवान रेडिओ लहरी कशा निर्माण करतात याचा अभ्यास करण्यासाठी ‘पीएसआरजे १२२७-४८५३’ या न्यूट्रॉन ताऱ्याचा प्रयोगशाळेप्रमाणे वापर करता येणार आहे. विश्वातील सर्वांत तीव्र रेडिओ लहरींमागील विविध प्रणाली समजून घेण्यासाठी मदत होणार आहे,’ असे डॉ. जयंता रॉय यांनी नमूद केले.