पुणे : ‘‘आयुर्वेद क्षेत्रासाठी ‘अच्छे दिन’ आले असून, या उपचारपद्धतीच्या संशोधन व विकासाला राजाश्रय मिळत आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केल्याने आयुर्वेदाला संस्थात्मक बळ मिळाले. आरोग्यसेवा अधिक परिणामकारक आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही उपचारपद्धतींचे एकात्मीकरण होणे आवश्यक आहे,’ असे मत गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी रविवारी व्यक्त केले.
रसायू लाइफ सायन्सेसच्या वास्तूचे उद्घाटन डाॅ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. खासदार मेधा कुलकर्णी आणि रसायूचे संस्थापक योगेश बेंडाळे उपस्थित होते.
सावंत म्हणाले, ‘आरोग्यसेवा अधिक परिणामकारक आणि रुग्णकेंद्रित करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी या दोन्ही उपचार पद्धतींचे एकात्मीकरण होणे ही काळाची गरज आहे. ॲलोपॅथीमधील काही औषधांच्या दुष्परिणामांचे व्यवस्थापन करण्यासाठी आयुर्वेदाची मदत घेतली जाते. त्यामुळे या दोन्ही वैद्यकीय पद्धतींचा समन्वय साधणे आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या पदवीवर ॲलोपॅथीचे उपचार करावेत, असा आग्रह नाही; परंतु जोपर्यंत दोन्ही पद्धतींचे एकात्मीकरण होत नाही, तोपर्यंत रुग्णसेवा अपूर्णच राहील. २०१४ नंतर आयुर्वेदाच्या शिक्षण आणि संशोधन पद्धतीत मूलभूत बदल झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही आयुर्वेदासाठी जामनगर येथे विशेष केंद्र उभारले आहे, ही मोठी जमेची बाजू आहे.’
कुलकर्णी म्हणाल्या, ‘आयुर्वेद केवळ छोट्या-मोठ्या आजारांवरच नव्हे, तर गंभीर आजारांवरही प्रभावीपणे काम करते. आयुर्वेदाला चांगले दिवस यावेत यासाठी राजकीय स्तरावरही सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.’
बेंडाळे म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार औषधोपचारही वेगळे असावे लागतात. ही क्षमता रसशास्त्रात आहे. आयुर्वेदाच्या छत्राखाली विविध उपचार पद्धतींचे एकात्मीकरण झाल्यास ते आरोग्यसेवा क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल.’
विषारी दारू प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई
विषारी दारूच्या घटनेवर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘राज्य उत्पादनशुल्क विभागाने अशा घटनांवर कडक नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. गोव्यामध्ये अशा प्रकारच्या बेकायदा दारूविक्रीवर पूर्णपणे बंदी असून, तसे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाते.’
