“स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीचं वाटते, कारण…”, असं म्हणत फडणवीसांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

…अन् कार्यक्रमास उपस्थित असलेल्यांची हसता हसता पुरेवाट लागली ; जाणून घ्या असं नेमकं काय सांगितलं फडणवीसांनी.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणावळ्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलताना, “खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीच वाटते” असं मिश्किलपणे सांगितलं आणि यावेळी त्यांनी या मागचं कारणही स्पष्ट केलं. तर, फडणवीस ते कारण सांगत असताना या कार्यक्रमास उपस्थितांची मात्र हसून हसून पुरेवाट लागल्याचं दिसून आलं. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा नागपुरचे महापौर होते तेव्हा त्यांच्या हस्ते एका स्मशानभूमीच्या झालेल्या उद्घाटनाचा किस्सा त्यांनी स्वतः आज सांगितला.

लोणावळ्यातील कार्यक्रमात बोलाताना फडणवीस म्हणाले, “मला खरोखर आनंद आहे की आज स्मशानभूमी बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी तयार करण्यात आलेली आहे. खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद् घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीचं वाटते. याचं कारण असं आहे की, मी नागपुरमध्ये महापौर असताना, एका स्मशानभूमीच्या उद् घाटनाला गेलो होतो. आमच्या तेव्हाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागामधील स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यानंतर कोनशीलचं अनावरण केलं. मग ते म्हणाले बघायला चला, तिथे लाकडं लावण्याची व्यवस्था केली गेली होती. मग म्हणाले तुम्ही पहिले लाकूड टाका, मग पहिले लाकूड टाकलं. मग त्यांनी लाकडं रचली आणि नंतर कुणाचातरी मृतदेह तिथे त्या दरम्याना आणला गेलेला होता, मग त्या लाकडांवर तो ठेवला गेला, मग टेंभा पेटला आणि टेंभा माझ्या हाती दिला आणि म्हणाले अग्नि तुम्हीच द्या. तेव्हापासून कुणी स्माशनभूमीच्या उद् घाटनाला बोलावलं की भीती मला वाटते. इथे मी चांगल्याप्रकारे उद् घाटन केलं आणि अशाप्रकाची कुठलीही वेळ माझ्यावर आणली नाही, याबद्दलही तुमचे आभार मानतो.” हा किस्सा ऐकताना उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकाला.

फडणवीस पुढे म्हणाले, “मात्र, अतिशय चांगल्याप्रकारे ही स्मशानभूमी ही तयार केली गेली आहे. शेवटी आपण असं मानतो की एक नवं जीवन हे मृत्यू नंतर देखील आहे. आत्मा अमर आहे, असं मानणाऱ्या पैकी आपण आहोत. आपण वैकुंठवासी होतो आणि मग वैकुंठ जे आहे ते सुंदरच असलं पाहिजे, स्वच्छचं असलं पाहिजे. त्या ठिकाणी पावित्रं असलं पाहिजे, दु:खात तिथे गेलेल्या लोकांना त्यांच्या दु:खावर फुंकर मारणारं वातावरण जर मिळालं, तर निश्चतपणे त्यांचं दु:ख थोडं कमी करता येतं आणि तीच व्यवस्था या ठिकाणी केली, या कामावबद्दल मी संबंधितांचे अभिनंदन करतो.”

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Going to the inauguration of the cemetery i feel a little scared fadnavis msr 87 kjp

Next Story
शेतमालाची १२४५ ठिकाणी थेट विक्रीव्यवस्था
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी