पुणे : शेतकऱ्यांवर दुष्काळाचा आर्थिक आणि सामाजिक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेने पुढाकार घेतला आहे. संस्थेच्या कृषी-अर्थशास्त्र संशोधन केंद्रामार्फत हा विशेष अभ्यास करण्यात येत असून, दुष्काळामुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेण्याबरोबरच त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचविण्यावर भर दिला जाणार आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या समन्वयाने या अभ्यासाची आखणी सुरू असून, येत्या महिनाभर ते दीड महिन्यात अहवाल तयार होण्याची अपेक्षा आहे. या अहवालाच्या आधारे शासनाला दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आखण्यास मदत होणार आहे, अशी माहिती संस्थेचे कुलगुरू डॉ. उमाकांत दाश यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
दुष्काळाच्या अभ्यासासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून निधी मिळणाऱ्या या संशोधन केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या केंद्रामार्फत देशपातळीवरील विविध राज्यांमध्ये समान स्वरूपाच्या कृषी आणि आर्थिक समस्यांवर नियमित संशोधन केले जाते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्याचे ठरविण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न, शेतीवरील परिणाम, आर्थिक अडचणी आणि दुष्काळामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जाणार आहे. केवळ परिस्थितीचे विश्लेषण न करता, त्यावर व्यावहारिक आणि परिणामकारक उपाय शोधण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचे दाश यांनी सांगितले.
या अभ्यासासाठी राज्याच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्यात आला असून, कोणते जिल्हे आणि तालुके अभ्यासासाठी निवडायचे, याबाबत सरकारसोबत चर्चा सुरू आहे. अद्याप अभ्यासाचे क्षेत्र आणि अंतिम स्वरूप निश्चित झालेले नाही. त्यामुळे सध्या कोणतेही निष्कर्ष किंवा आकडेवारी उपलब्ध नसल्याचे डॉ. दाश यांनी स्पष्ट केले.दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या कृषी-अर्थशास्त्र संशोधन केंद्रातील प्राध्यापकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन दिले आहे. या माध्यमातून सुमारे तीन लाख ३० हजार रुपयांचे योगदान देण्यात आले आहे. संशोधनासोबतच सामाजिक समस्यांमध्येही योगदान देण्याच्या संस्थेच्या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे डॉ. दाश यांनी सांगितले.
