पुणे : ‘शेअर बाजारातील गुंतवणुकीचे निर्णय अधिक अचूक आणि माहितीपूर्ण घेता यावेत, यासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘मशीन लर्निंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून शेअरच्या किमतींचे भाकित करणारे उपकरण गोखले संस्थेतील प्राध्यापकांनी विकसित केले आहे. ‘स्टॉक प्राइस प्रेडिक्शन डिव्हाइस’ असे या उपकरणाचे नाव असून, गोखले इन्स्टिट्यूटच्या इतिहासातील हे पहिले पेटंट ठरले आहे. संस्थेचे सहायक प्राध्यापक अर्जुन गोयल यांनी हे संशोधन केले आहे,’ अशी माहिती गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. उमाकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

पेटंटचा नोंदणी क्रमांक ५१३४९५ आहे. या उपकरणाच्या माध्यमातून मागील २० ते २५ वर्षांतील शेअर बाजारातील आकडेवारीचे विश्लेषण करून पुढील दिवसांतील किंवा आगामी कालावधीतील शेअरच्या किमतींचा अंदाज व्यक्त करता येणार आहे. पारंपरिक भांडवली मालमत्ता मूल्यनिर्धारण पद्धतीपेक्षा अधिक व्यापक माहिती आणि प्रगत एआय-एमएल तंत्रज्ञानाचा वापर हे या संशोधनाचे वैशिष्ट्य आहे. सध्या हे उपकरण चाचणीच्या टप्प्यात असून, भविष्यात खासगी गुंतवणूक कंपन्यांच्या सहकार्याने त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे. सध्या या पेटंटची मालकी गोखले इन्स्टिट्यूटकडे आहे. हे उपकरण सर्वांसाठी खुले असून खासगी कंपन्या आणि ‘एनएसई’सारख्या स्टॉक मार्केटमध्येही वापरासाठी उपयुकत ठरणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना सहाय्यक प्राध्यापक अर्जुन गोयल यांनी सांगितले, की या उपकरणाद्वारे गुंतवणुकीचा मागील २० ते २५ वर्षांपूर्वीची सगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच, गुंतवणूकदारांना या उपकरणांच्या माध्यमातून पुढील दिवसांचा बाजारपेठेचा कल समजण्यास मदत होणार आहे. हे उपकरण विकसित करण्यासाठी गेल्या वर्षभर संशोधन सुरू होते. खाजगी कंपन्या तसेच स्टॉक एक्सचेंज साठी हे उपकरण फायदेशीर ठरणार आहे.