पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील महिलांसाठीचे एकमेव स्वच्छतागृह पाडण्यात आल्याने महिलांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर, गोखले रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर स्वच्छतागृहांच्या अभावी विद्यार्थी, नोकरदार, पदपथ विक्रेत्यांसह पुणेकर त्रस्त आहेत. राजकीय पक्षांनी शेकडो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची प्रलोभने देण्याऐवजी सार्वजनिक स्वच्छतेच्या मूलभूत प्रश्नावर बोलायला हवे, अशी अपेक्षा पुणेकरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. मात्र, यासंबंधी विचारले असता स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे निवडणुकीच्या धामधुमीत व्यग्र असल्याचे त्यांच्या खासगी सचिवांनी सांगितले.

नामांकित शिक्षणसंस्था, नाट्यगृहे आणि जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांची दालने असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छतागृहे नाहीत. संभाजी उद्यान आणि पुलाची वाडी येथे असलेली दोन स्वच्छतागृहे जंगली महाराज रस्त्यापासून आतल्या बाजूला असल्याने सहज सापडत नाहीत. तर, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटच्या शेजारी असलेले एकमेव स्वच्छतागृह केवळ पुरुषांसाठीच खुले आहे.

कलाकार कट्टा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा परकीय भाषा विभाग, फर्ग्युसन महाविद्यालय ते पोलीस कवायत मैदान आणि परिसरातील शैक्षणिक संस्थांमुळे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर तरुणांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. तर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी), बालगंधर्व ते ‘गरवारे सर्कल’पर्यंत नामांकित कंपन्यांची दालने आणि कार्यालयांमुळे जंगली महाराज रस्त्यावर कायम गजबज असते. मध्यवर्ती भागातील हे दोन्ही रस्ते शहराच्या कोणत्याही ठिकाणी प्रवासासाठी सोयीचे आहेत. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अभावी कित्येक नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांना त्याचा विशेष त्रास होतो. पाणी कमी पिल्याने होणारे अपचन, आतड्याचे आजार आणि मूत्राशयाच्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होत असून, वेेळेवर स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने मानसिक ताण निर्माण होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले.

नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरून प्रवास करणारी एक विद्यार्थिनी सांगते, ‘स्वच्छतागृहांचा प्रश्न रोजचाच आहे. मोठी गैरसोय होते. महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत मनात भीती असते. कामात लक्ष लागत नाही.’ जंगली महाराज रस्त्यावरही तीच अवस्था असल्याकडे तिने लक्ष वेधले. या दोन्ही रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही या गैरसोयीचा फटका बसतो. पदपथ विक्रेत्यांची अवस्था त्याहून वाईट आहे. नेहमीच्या ग्राहकावर विश्वास ठेवून, तर कित्येकदा दुकान उघडे ठेवून दूरवर जावे लागत असल्याची तक्रार विक्रेते करतात. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर सुमारे १४ वर्षांपासून व्यवसाय करत असलेले एक विक्रेते सांगतात, ‘दुकानात थांबले नाही, तर व्यवसाय होत नाही. महापालिका आमच्याकडून कर घेते. मात्र, कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा पदपथ विक्रेत्यांना देण्यात येत नाहीत.’

‘हॉटेल्स, कॅफे अशा ठिकाणी स्वच्छतागृह वापरायला परवानगी असते. मात्र, कित्येकदा माहिती नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याची माहिती नसते. त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक व्यापक स्तरावर उपाययोजना आणि जनजागृती करणे गरजेचे आहे,’ असे अभिषेक लोंढे या विद्यार्थ्याने सांगितले.

जागेच्या अडचणीमुळे काही ठिकाणी स्वच्छतागृहांचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, जागा उपलब्ध झाली की, लगेचच हा प्रश्न सोडविण्यात येईल.- अविनाश सकपाळ, उपायुक्त, घनकचरा व व्यवस्थापन, पुणे महापालिका

‘टॉयलेट सेवे’ची रखडपट्टी’

नागरिकांना त्यांच्या जवळपास असलेल्या स्वच्छतागृहांची अद्ययावत माहिती ‘टॉयलेट सेवा’ ॲपच्या माध्यमातून देण्यात येते. सुरुवातीला पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती गोळा करण्यात आली. त्याला प्रतिसादही मिळाला. मात्र, त्यापुढचे काम प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रखडले. आता सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासनाबरोबर काम करायला तयार आहे. त्यासाठी महापालिकेनेही पुढाकार घ्यायला हवा,’ अशी माहिती ‘टॉयलेट सेवा’ ॲपचे निर्माते अमोल भिंगे यांनी दिली. पुणे, मुंबई आणि नागपूर मेट्रोमध्ये ‘टॉयलेट सेवे’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.