लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: शहरात महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत महिलांकडील तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. पर्वती पायथा, कात्रज-कोंढवा रस्ता आणि बिबवेवाडी भागात या घटना घडल्या.

पर्वती गाव परिसरात राहणारी महिला सकाळी सव्वासहाच्या सुमारास नंदादीप एज्युकेशन सोसायटी परिसरातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे तपास करत आहेत.

आणखी वाचा- पुणे: थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघालेल्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख ३५ हजार रुपयांचे मंगळसूत्र, लक्ष्मीहार असा एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. महिलेने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत. बिबवेवाडी भागात सकाळी पावणेआठच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे तपास करत आहेत.

महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना सकाळी सहा ते आठ या वेळेत घडल्या आहेत. बिबवेवाडी, पर्वती पायथा तसेच कात्रज-कोंढवा रस्त्यावर दागिने हिसकावण्याच्या घटना एकपाठोपाठ घडल्या. वेगवेगळ्या भागात दागिने हिसकावणारे चोरटे एकच असावेत असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold chain thieves increase in the city pune print news rbk 25 mrj
First published on: 28-03-2023 at 18:04 IST