पिंपरी-चिंचवडमध्ये फोटो काढण्याच्या बहाण्याने ६५ वर्षीय जेष्ठ महिलेचे सोन्याचे गंठन घेऊन अज्ञात दोघांनी पोबारा केला आहे. पिंपरी-चिंचवडमधील दिघी ही घटना परिसरात घडली असून जेष्ठ महिलेला ओळखत असल्याचे भासवून फसवणूक केली आहे. यावेळी महिलेचे चार तोळे सोन्याचे गंठन घेऊन दोन अज्ञातांनी पळ काढला आहे. गंठनाची किंमत दीड असल्याची माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. विमल महादेव बांगर असे फसवणूक झालेल्या जेष्ठ महिलेचे नाव आहे.

विमल बांगर यांचा मुलगा दादासाहेब बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमल या बांगड्या भरून घराकडे येत होत्या. तेव्हा, एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवून काकू तुम्ही मला ओळखलं का? अस म्हटलं. अज्ञात आरोपीने त्यांची ओळख असल्याचं भासवल. तुमच्या गळ्यातील गंठन सारखे हुबेहूब गंठन बनवायचे आहे असे त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचा विश्वासात घेतले. दरम्यान, गंठणाचा फोटो काढायचा आहे असे त्या व्यक्तीने विमल यांना सांगितले. मात्र विमल यांच्या गळ्यात असलेल्या गंठणाचा फोटो व्यवस्थित येत नसल्याचे सांगत तुम्ही गळ्यातील गंठन काढून हातात घ्या मग मी फोटो काढतो असे सांगत त्यांना गळ्यातील गंठण काढण्यास भाग पाडले. याचाच फायदा घेत हाताला हिसका मारून गंठण घेऊन आरोपीने पोबारा केला आहे.

ही घटना दिघीमध्ये घडली असून पोलीस उपनिरीक्षक दळवी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, सोन्याचे दागिने घातल्यानंतर महिलांनी अशा व्यक्तींच्या भूल थांपाना बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक दळवी यांनी केले आहे.