पुणे : बकरी ईंदनिमित्त लष्कर भागातील गोळीबार मैदान परिसरात गुरुवारी (२८ मे) सामुहिक नमाज पठण होणार आहे. यापार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅा. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
‘बकरी ईदनिमित्त नमाजपठण करण्यासाटी गोळीबार मैदान परिसरात मुस्लीम बांधवांची गर्दी होती. या भागातील गर्दी विचारात घेऊन गोळीबार मैदान परिसरातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारी सकाळी सहानंतर बदल करण्यात येणार आहेत. गर्दी ओसरेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील गोळीबार मैदान चौक, मम्मादेवी चौक, सीडीओ चौक, सोलापूर बाजार चौकी परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबोनाला ते गोळीबार मैदान चौक दरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी नेपियर रस्ता, बिशप स्कूल, कमांड हाॅस्पिटलमार्गे, लुल्लानगर चौकातून मार्केट यार्डकडे जावे. शंकरशेठ रस्त्यावरुन गोळीबार मैदान चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी गुलटेकडी, सॅलिसबरी पार्क, सीडीओ चौकातून नेपीयर रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे,असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
